सुरक्षारक्षकाच्या मानेवर चॉपर ठेवत ‘एटीएम’ फोडण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

जळगाव - शहरात राष्ट्रीय महामार्गावर दादावाडी जैन मंदिराजवळील आयडीबीआय बॅंकेच्या ‘एटीएम’वर आज पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान दरोडेखोरांनी दरोडा टाकला. या केंद्रात नियुक्त सुरक्षारक्षकाच्या मानेवर शस्त्र लावून चक्क एटीएम मशिन उखडून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जळगाव - शहरात राष्ट्रीय महामार्गावर दादावाडी जैन मंदिराजवळील आयडीबीआय बॅंकेच्या ‘एटीएम’वर आज पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान दरोडेखोरांनी दरोडा टाकला. या केंद्रात नियुक्त सुरक्षारक्षकाच्या मानेवर शस्त्र लावून चक्क एटीएम मशिन उखडून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

‘एटीएम’मध्ये रोकड नसल्याचे सुरक्षारक्षकाने सांगितल्यानंतर मात्र दरोडेखोरांनी मोडेम मशिन आणि मोबाईल घेऊन पोबारा केला. दरम्यान, या घटनेच्या अवघ्या दहाच मिनिटांपूर्वी ‘एटीएम’ परिसरात तपासणी करून गेलेल्या गस्तीवरील पोलिस पथकाला पुन्हा दूरध्वनी आल्यावर त्यांनी तत्काळ धाव घेत महामार्गावर नाकाबंदीही केली. मात्र, चोरटे पसार होण्यात यशस्वी ठरले.

अशी घडली घटना
शहरातील दादावाडी जैन मंदिराशेजारीच दादू अपार्टमेंटमधील गाळ्यात आयडीबीआय बॅंकेचे ‘एटीएम’ आहे. तेथे सुरक्षारक्षक म्हणून रात्रपाळीवर भावसिंग झिपरू सपकाळे (वय ६२) होते. नेहमीप्रमाणे रात्री साडेआठला सपकाळे कामावर आले होते. ‘एटीएम’ केबिनमधीलच बॅकअप चेंबरमध्ये ते खुर्चीवर बसून होते. रात्री गस्तीवरील तालुका पोलिस ठाण्याचे पथक पहाटे चारच्या सुमारास ‘एटीएम’वर येऊन पाहणी करीत पुढच्या गस्तीवर निघून गेले. त्यानंतर अवघ्या दहा- पंधरा मिनिटांनी म्हणजे चार वाजून २० मिनिटांनी तोंडाला मास्क, अंगावर शॉल ओढलेल्या तरुणांनी ‘एटीएम’मध्ये प्रवेश करीत रक्षक सपकाळे यांच्या गळ्यावर चॉपर ठेवत ‘अपनी जगहपर बैठ, ज्यादा होशियारी मत करना...’ असे म्हणत धमकावले. सोबतच केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या केबलही तोडल्या.

सुरक्षारक्षकाला चांगलेच दरडावले
आडदांड शरीरयष्टी असलेल्या दरोडेखोराने सपकाळे यांच्या मानेवर शस्त्र लावून धरले असताना, काही मिनिटांत इतरांनी ‘एटीएम’ फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सपकाळेंनी ‘अरे बापू त्याच्यात पैसेच नाहीत...’ असे म्हणताच दोघा- तिघांनी त्याच्या दिशेने धाव घेत डोळे वटारत पुनःपुन्हा विचारपूस केली आणि त्याला दरडावले.

‘एटीएम’मध्ये अगोदर एकजण शिरला. त्याच्या अंगावर शॉल आणि तोंड बांधले होते. मला वाटले, की कॉलेजच्या पोरांची सहल असेल. इतक्‍यात एकाने चाकू लावत गप्प राहण्याचे सांगितले.
- भावसिंग सपकाळे, सुरक्षारक्षक

लाखो रुपये सुरक्षित
दादावाडी परिसरातील या ‘एटीएम’मध्ये जवळपास दहा-बारा लाखांची रोकड असण्याची शक्‍यता वर्तविली जात असून, हेच मशिन उखडून नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, सुरक्षारक्षकाच्या तोंडून निघालेला ‘पैसे संपल्या’चा शब्द गुन्हा घडण्यापासून वाचवून गेला. 

दोरखंडाने मशिन उखडण्याचा प्रयत्न
दोघांनी मोठा दोरखंड आणत ‘एटीएम’ यंत्राला गुंडाळून घट्ट बांधला. दोरखंडाचे दोन्ही भाग केबिनबाहेरपर्यंत नेऊन ते एका जीपच्या मागील बाजूस बांधत असल्याचे सुरक्षारक्षकाने बघितले. ‘एटीएम’च्या बाहेर महामार्गाकडे तोंड करून उभ्या केलेल्या जीपमध्ये बसलेल्या चालकास ओढण्याचा इशारा करून ‘एटीएम’चे पूर्ण मशिनच उखडून काढण्याचा प्रयत्न केला. दोन- तीन वेळा ओढल्यानंतरही मशिन निघू शकले नाही.

दरोडेखोर शहराच्या दिशेने पसार
‘एटीएम’ यंत्रासाठी आवश्‍यक इन्व्हर्टर- बॅटरी ठेवण्यासाठी असलेल्या बॅकअप केबिनमध्ये लावलले मोडेम मशिन (१७ हजार रुपये), सपकाळे यांच्या खिशातील मोबाईल, असा सुमारे १८ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन दरोडेखोर शहराच्या दिशेने पसार झाले. त्यानंतर लगेच सपकाळे यांनी दुसऱ्या मोबाईलवरून तालुका पोलिसांना घटना कळविताच गस्तीवर असलेले सहाय्यक निरीक्षक सचिन बागूल काहीच मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ त्यांनी नियंत्रण कक्षाला माहिती कळवून जिल्ह्याची नाकाबंदी केली. मात्र, दरोडेखोर मिळून आले नाहीत. या प्रकरणी सपकाळेंच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस जाताच आले दरोडेखोर
सुरक्षारक्षक सपकाळे केबिनमध्ये बसल्याची खात्री स्वत: सहाय्यक निरीक्षक बागूल यांनी केल्यानंतर पुढच्या गस्तीला वाहन निघाले. पोलिसांचे वाहन निघताच अवघ्या दहाव्या मिनिटांत शस्त्र घेतलेले दरोडेखोर आत शिरले. त्यांनी वीस मिनिटे ‘एटीएम’ यंत्र उघडून नेण्याचा प्रयत्न केला; पण उपयोग झाला नाही.

Web Title: jalgaon news ATM theft trying