भारत-पाकिस्तान तणावाचा केळी उत्पादकांना फटका 

दिलीप वैद्य
रविवार, 16 जुलै 2017

रावेर - भारत-पाकिस्तान संबंधांत तणाव निर्माण झाल्याचा फटका खानदेशातील केळी उत्पादकांना बसू लागला आहे. दोन्ही देशांतील तणावामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पाकिस्तानामध्ये केळीची निर्यात पूर्णपणे थांबल्याने या वर्षी खानदेशी केळीची निर्यात निम्म्यावर आली आहे. 

दरम्यान, या दोन देशांतील आयात-निर्यातीतून मिळणाऱ्या नफ्यातील पैसा हवालाच्या माध्यमातून दहशतवाद्यांकडे जात असल्याचा संशय राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) आल्यामुळे आगामी काळात ही निर्यातही बंद होण्याची चिन्हे आहेत. असे झाल्यास सर्वाधिक फटका केळीला बसणार आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, की 2008 पासून जिल्ह्यातील केळी मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानात निर्यात होत आहे. दर्जेदार केळीला पाकिस्तानातून मागणी वाढल्याने निर्यातीत दरवर्षी वाढ होत होती. दरवर्षी सुमारे दोन हजार ट्रक केळी पाकिस्तानात निर्यात होतात. या व्यतिरिक्त टोमॅटो, कांदे व फळांची आयात-निर्यात सुरू होती. 

भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेल्याने केळींची निर्यात यंदा निम्म्यावर म्हणजे एक हजार ट्रकवर आली आहे. गेल्या दीड महिन्यापासून तर निर्यात जवळपास बंदच आहे. येथील शेतकरी, व्यापारी, केळी ग्रुप चालक यांचा थेट संबंध पाकिस्तानी व्यापाऱ्यांशी येत नाही. दिल्ली किंवा जम्मू-काश्‍मीरमधील व्यापारी ही केळी पाकिस्तानात पाठवितात. जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी व केळी ग्रुप चालकांना देशातील व्यापारीच पैसे देतात. पाकिस्तानला होणाऱ्या विविध वस्तूंच्या निर्यातीत खानदेशातील केळीचे प्रमाण सर्वाधिक आहे. एकूण दोन ते अडीच हजार कोटी रुपयांची उलाढाल गृहीत धरल्यास यात केळीचा वाटा सुमारे आठशे ते नऊशे कोटींचा आहे. 

"एनआयए'ची नजर 
भारत-पाकिस्तानदरम्यान होणाऱ्या 21 विविध प्रकारच्या वस्तूंच्या आयात-निर्यातीवर भारताच्या "एनआयए'ची नजर असल्याची चर्चा केळी व्यापारी व केळी ग्रुप चालकांमध्ये आहे. त्यासाठी एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा हवाला देण्यात येत आहे. या वृत्तानुसार या आयात-निर्यात व्यापारातील सुमारे शंभर कोटी रुपये काश्‍मीरमधील दहशतवाद्यांना दिले जात असल्याचा संशय "एनआयए'ला आहे. याच्याशी जिल्ह्यातील केळी व्यापारी किंवा केळी ग्रुप चालक यांचा संबंध नसला तरी आपल्याकडे चौकशी होऊ शकते, अशी त्यांना भीती आहे. 

Web Title: jalgaon news banana