चाळीसगाव: 'बेलगंगा' कामगारांना 'पीएफ'चा दिलासा 

आनन शिंपी
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

बेलगंगा साखर कारखान्याचा लिलाव होऊन हा कारखाना तालुक्‍यातील भूमीपुत्रांनी स्थापन केलेल्या अंबाजी ट्रेडिंग कंपनीने विकत घेतला आहे. मात्र, तरीही या कारखान्याच्या कामगारांना आपल्या हक्काचा पैसा मिळण्याबाबत साशंकता आहे. कारखान्याचे बहुतांश कर्मचारी सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांच्या वारसांसह आहे ते कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत आहेत.

चाळीसगाव : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने विक्री केल्यामुळे चर्चेत आलेल्या बेलगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्काचा पैसा अद्यापपर्यंत मिळालेला नाही. अशा परिस्थितीत आपापल्या परीने लढा देणाऱ्या या कामगारांना भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने दिलासा दिलेला आहे. 

बेलगंगा साखर कारखान्याचा लिलाव होऊन हा कारखाना तालुक्‍यातील भूमीपुत्रांनी स्थापन केलेल्या अंबाजी ट्रेडिंग कंपनीने विकत घेतला आहे. मात्र, तरीही या कारखान्याच्या कामगारांना आपल्या हक्काचा पैसा मिळण्याबाबत साशंकता आहे. कारखान्याचे बहुतांश कर्मचारी सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांच्या वारसांसह आहे ते कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत आहेत. 11 जानेवारीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला एका रिट पिटीशनमध्ये (क्रमांक 2969/2016) तीन आठवड्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे अकरा कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे पैसे भरले की नाही याबाबत कुठलाही खुलासा जिल्हा बॅंकेने आजतागायत केलेला नाही. त्यामुळे नाशिक येथील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी 14 सप्टेंबरला जिल्हा बॅंकेच्या कार्यकारी संचालकांना पत्र देऊन याबाबतचा खुलासा मागितला आहे. हा भरणा केला नसल्यास जिल्हा बॅंकेविरूद्ध न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्यात येईल अशी तंबी दिली आहे.

यासोबतच भरणा केलेला असल्यास बेलगंगा विक्री प्रक्रियेचे इतिवृत्तही मागवले आहे, अशी माहिती बेलगंगा सहकारी साखर कारखाना एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी हिंमतराव देसले यांनी दिली. कारखाना कुठल्याही परिस्थिती पुन्हा सुरू व्हावा, अशी कर्मचाऱ्यांची इच्छा आहे. किंबहुना त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी देखील आहे त्या कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे. मात्र, हे करीत असताना आमच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी संबंधितांनी घ्यावी व आमच्या हक्काचे जे थकीत पैसे आहेत ते मिळावेत, एवढीच अपेक्षा असल्याचे श्री. देसले यांनी सांगितले. 

Web Title: Jalgaon news Belganga sugar factory in chalisgaon