शोकाकुल वातावरणात पाचही मृतांवर अंत्यसंस्कार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

शोकाकुल वातावरणात पाचही मृतांवर अंत्यसंस्कार 

भुसावळ : येथील भाजप नगरसेवक रवींद्र खरातसह पाचही तरुणांवर रात्री नऊच्या सुमारास तापी नदी किनारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे उपस्थित होते. सायंकाळी सातला समतानगर येथून चार व अन्य एका जागेवरून असे पाच रथ निघाले. यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते. एकूणच हे दृश्य मन हेलावून सोडणारे होते. 

दरम्यान, नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक छेरींग दोर्जे यांनी सोमवारी (ता. ७) घटनास्थळाला व खरात यांच्या घराला भेट देऊन पाहणी केली. पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी सांगितले की, घटनास्थळावरून दोन पिस्टल, दोन चाकू जप्त करण्यात आले आहे. तर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नाही, पोलिसांकडून गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू असल्याने अधिक काही सांगता येणार नाही. तिन्ही आरोपी गोळीबार करताना तसेच चाकू व चॉपरचा वापर करताना जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आरोपीच्या हातांना जखमा झाल्या आहेत. 

कडक बंदोबस्त तैनात 
समतानगर परिसरात पोलिसांनी आरसीपीसह जिल्ह्यावरून कुमक मागवून बंदोबस्त वाढवला आहे. रात्री घटनास्थळाची जिल्हा पोलिस अधीक्षक व अप्पर अधीक्षकांनी पाहणी केली. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी ठसे तसेच छायाचित्रे घेतली. आरोपींनी खुनासाठी वापरलेला चाकू तसेच तसेच शेजारील पवार यांच्या घरात पडलेला गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. 

तासाभरात आरोपी जाळ्यात 
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी. जी. रोहोम व पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे त्यांनी शेखर ऊर्फ राजा हिरालाल मोघे, राजा बॉक्सर मोहसीन ऊर्फ अजगर खान व मयूर सुरवाडे यांच्या तासाभरात मुसक्या आवळल्या. हल्ल्यात मृत नगरसेवक रवींद्र खरात यांच्या पत्नी रजनी खरात यांच्या डोक्याला मार लागला असून, मुलगा हंसराज यांच्या पाठीला गोळी लागली, सूरत सपकाळे यांच्या कानाला स्पर्श करून गोळी गेल्याने तो देखील जखमी झाला. त्यांच्यावर जळगावात उपचार सुरू आहेत. हंसराज रवींद्र खरात (वय २०) यांच्या फिर्यादीनुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड तपास करीत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon news bhushawal khun prakaran