तीन टनच्या रिॲक्‍टरसह ॲसिडिक द्रावणाचा स्फोट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

रिॲक्‍टरमध्ये हायड्रोब्रोमिक ॲसिड आणि हायड्रोजन पॅराक्‍साइड यांच्या संयुगातून निर्माण झालेल्या अतिरिक्त दबावाने स्फोट घडण्याची शक्‍यता असून दुर्घटनेला कारणीभूत घटकांचा शोध घेतला जात आहे.
- दिलीप इंगळे, सिनिअर सुपरवायझर, प्रॉडक्‍शन 

हायड्रोब्रोमिक ॲसिड, हायड्रोजन पॅरॉक्‍साईड संपर्कातून अनियंत्रित दाबामुळे दुर्घटना
जळगाव - औद्योगिक वसाहत परिसरातील गीतांजली केमिकल्सच्या प्रोसेसिंग विभागात काल (७ जानेवारी) रात्री झालेल्या स्फोटाने परिसर हादरला. या स्फोटात आठ कामगार गंभीरपणे भाजले गेले. दरम्यान, कंपनीतील हायड्रोब्रोमिक ॲसिड व हायड्रोजन पॅरॉक्‍साईडच्या संयुगातून अनियंत्रित दाब (प्रेशर) तयार होऊन तीन टनच्या रिॲक्‍टरसह ॲसिडिक द्रावणाचा हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर कंपनीतील काम पूर्णत: बंद असून कंपनी व्यवस्थापनातर्फे घडलेल्या दुर्घटनेची मूळ कारणे शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. 

सुरेश कुमार मोहता यांची मूळ मालकी असलेल्या, गीतांजली केमिकल्स या औद्योगिक वसाहत परिसरातील एफ-३५ या जागेवर स्थित रासायनिक पदार्थ निर्माते कंपनी वर्ष-१९८५ साली स्थापन करण्यात आली होती. या कंपनीत यापूर्वीही दुर्घटना घडून कामगारांचा मृत्यू झाला होता, अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच कंपनीत झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू ओढवला असताना रविवारी (ता.७) रात्री पुन्हा दुर्घटना घडली. या कंपनीत औषध निर्मिती-शेती आणि औद्योगिक वापरासाठी आवश्‍यक रसायनांचे उत्पादन करण्यात येते. 

रविवारी रात्रपाळीचे कामगार काम करीत असताना रिॲक्‍टरमध्ये हायड्रोब्रोमिक ॲसिड (HBR) आणि हायड्रोजन पॅराक्‍साईड(H२O२) भरले जात असताना दोन्ही रसायनांच्या संयुगातून अनबेअरेबल दबाव (अनियंत्रित दबाव) तयार होऊन स्फोट घडून आला. घडलेल्या स्फोटाची भीषणता इतकी होती की, प्रोसेसिंग युनिटच्या तीन मजली मजबूत सिमेंट काँक्रिटचा आराखडा (स्ट्रक्‍चर) हादरून तीन टन वजनाची रिॲक्‍टर टॅंक खाली कोसळली, रिॲक्‍टरमधील मिश्रण आणि स्फोटामुळे ॲसीडसह इतर रसायने वाहून नेणाऱ्या ओव्हरहेड पाईपलाईन्स्‌ फुटल्या. 

रिॲक्‍टरजवळ काम करणारे आठ कामगारांच्या अंगावर द्रावण पडल्याने भाजले गेले आहेत. 

व्यवस्थापनाकडून पाहणी 
या दुर्घटनेनंतर परिसरात वायुगळतीमुळे डोळ्यात जळजळ आणि श्‍वास घेण्यास त्रास जाणवत होता. रात्रीचा अंधार आणि पुन्हा काही विपरीत घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून रात्रीच्या ‘रेस्क्‍यू ऑपरेशन’नंतर काम बंद ठेवण्यात आले. सकाळी कंपनी व्यवस्थापनाकडून पाहणी करण्यात येऊन घटनेमागील मूळ कारणांचा तपास सुरू आहे.

घटनेची चौकशी स्वतः करू - जिल्हाधिकारी
एमआयडीसी परिसरातील गीतांजली केमिकल्समध्ये झालेल्या स्फोटाची चौकशी मी स्वतः करणार असून, कंपनी सील केली जाईल. सोबतच अशा धोकादायक कंपन्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली. कंपनीत काल झालेल्या घटनेत भाजलेल्या चार जणांना जिल्हा रुग्णालयात, तर एकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना कशी घडली? घटनेला जबाबदार कोण? बॉयलरवर सुरक्षिततेसाठी काही उपाययोजना होत्या किंवा नाही, वारंवार याच कंपनीत स्फोट का घडतात आदी कारणांचा शोध घेऊन कंपनी सील केली जाईल. एमआयडीसीत असे जे उद्योग धोकादायक आहेत, त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना आहेत किंवा नाही, याचीही चौकशी करून त्या उद्योगांवर कारवाई करू, असे श्री. निंबाळकर यांनी सांगितले.

 नुकसान कोटीच्या घरात 
 कंपनी तूर्तास बंद 
 रहिवाशांना नेहमीचा त्रास
 भीतीचे सावट कायम

Web Title: jalgaon news blast in gitanjali chemical