चौपदरीकरणात गिरणा नदीवर होणार पुलासह बंधारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

जळगाव - शहराच्या हद्दीतून जात असलेल्या महामार्गाचे चौपदरीकरण करताना गिरणा नदीवर नवीन पूल उभारण्यात येणार आहे. या पुलाचे बांधकाम करताना ‘पूल- कम- बंधाऱ्या’ची रचना करावी, अशी विनंती विधान परिषदेचे सदस्य चंदूलाल पटेल यांनी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना केली. त्यांनी ती तत्त्वत: मान्य केली. आज दिल्लीत श्री. गडकरी यांची भेट घेऊन आमदार पटेल यांनी याबाबत निवेदनही दिले.

शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास लवकरच सुरवात होणार आहे. चौपदरी महामार्ग शहराबाहेरून जाणार असून, त्यात गिरणा नदीवर नवीन पूल बांधण्यात येणार आहे. बांभोरी ते जळगाव शहराला जोडणाऱ्या या पुलाचे बांधकाम करताना ‘पूल- कम- बंधारा’ असे बांधकाम करावे.

तत्त्वत: मान्यता

श्री. गडकरी यांच्याकडे सध्या परिवहन, भूपृष्ठ विभाग आणि जलसंपदा विभागाचीदेखील जबाबदारी आहे. थोडाफार अधिकचा खर्च करून दोन्ही उद्देश साधणे शक्‍य होत आहे. देशात सुरू असलेल्या महामार्गाच्या कामात आपण सध्या ‘पूल-कम-बंधारा’ ही संकल्पना राबवीत असून, शहरातदेखील ‘पूल-कम-बंधारा’ बांधण्यात येईल. यासाठी श्री. गडकरी यांनी या विषयाला तत्त्वतः मान्यता दिली. तसेच चौपदरीकरणाच्या कामाला लवकर सुरवात करणार असल्याचेही सांगितले.

असा होऊ शकतो लाभ
गिरणा नदीवर ‘पूल- कम- बंधारा’ बांधल्यास नदीचे वाहून जाणारे पाणी अडविले जाऊन परिसरातील शेतकऱ्यांना आणि गावांना त्याचा फायदा होईल. तसेच जळगाव शहराला पाणीटंचाईची झळ पोहोचल्यासदेखील त्या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग होऊ शकतो, याबाबत आमदार पटेल यांनी श्री. गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले.

Web Title: jalgaon news bridge with dam on girana river