फिर्यादी आईनेच केला मुलीचा खून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

आज दुपारी साडेबाराच्या सुमारास सायली पाटील हिची आई रत्ना पाटील (वय 50) यांना या गुन्ह्यात मुलीची मारेकरी म्हणून अटक करण्यात आली.

चाळीसगाव (जळगाव) : शहरातील शिवकॉलनी परिसरात सोमवारी (ता. 3) रात्री बारावाजेच्या सुमारास मूळ देशमुखवाडी (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी व चाळीसगाव आगारातील वाहक अनिल पाटील यांची मुलगी तथा तृतीय वर्ष बी. एस्सी.तील विद्यार्थिनी सायली पाटील (वय 20) हिच्या खूनप्रकरणी पोलिसात फिर्याद देणारी तिची आईच मारेकरी निघाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. 

सायली ही तिच्या अभ्यासाच्या खोलीत असताना तिचा खून झाला होता. ही घटना घडली त्यावेळी घरात सायलीची आई व भाऊ शेजारच्या खोलीत झोपलेले होते. या खून प्रकरणी आधीपासूनच आईवर संशय व्यक्त केला जात होता. 'सकाळ'च्या 6 जुलैच्या अंकात 'कुटूंबातील सदस्यावर संशयाची सुई' या शिर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास सायली पाटील हिची आई रत्ना पाटील (वय 50) यांना या गुन्ह्यात मुलीची मारेकरी म्हणून अटक करण्यात आली. याबाबतची माहिती पोलिसांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे सायली पाटीलचा खून तिच्या आईने केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, हा खून का केला, याविषयी रत्ना पाटील यांचा अबोला कायम आहे. मुलीच्या खून करण्यापर्यंत आईची मजल का गेली, या घटनेमागे आणखी काही तिचे साथीदार आहेत काय? गुन्ह्याकामी कोणत्या हत्याराचा उपयोग केला? तसेच गुन्ह्याचा मूळ उद्देश नेमका काय होता? याबाबत गोपनीय पद्धतीने सखोल तपास सुरू असल्याचे शहर पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील यांनी सांगितले. 

Web Title: jalgaon news chalisgaon complainant mother murders daughter