बिबट्याच्या हल्ल्यातील जगतापांचा मृतदेह तहसील आवारात

अर्जुन परदेशी
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

यापूर्वी तीनजणांचा बळी घेतल्यानंतर ही वनविभागाने उपाययोजना केली नाही. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यात दिपालीच्या रुपात चौथा बळी गेला आहे.

चाळीसगाव : वरखेडे शिवारात कपाशीची वेचणी करीत असलेल्या दिपाली जगताप (२५) हिच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात अक्षरशः दिपालीच्या शरीराचे बिबट्याने लचके तोडल्याने छिन्न विच्छिन्न मृतदेह रात्री उशिरा शहरातील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. आज सकाळी दिपालीच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेऊन सकाळी दहा वाजता सरळ तहसीलदार कार्यालय आवारात आणून ठेवल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वन विभागाने आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने दिपालीला जीव गमवावा लागला आहे यापूर्वी तीनजणांचा बळी घेतल्यानंतर ही वनविभागाने उपाययोजना केली नाही. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यात दिपालीच्या रुपात चौथा बळी गेला आहे. एवढेच नव्हे तर काल घटना घडल्यानंतर वनविभागाने तीन तास उशिराने दखल घेतली. तसेच, वीज वितरण कंपनीनेदेखील सहकार्याची भूमिका घेतली नाही. तसेच आम्ही पिकअप व्हॅनमध्ये मृतदेह दवाखान्यात आणला. मात्र, गावकऱ्यांनी रात्रभर वनविभागाच्या आनास्थेविरोधात रोष व्यक्त केला. त्यामुळे आज दिपालीचा मृतदेह तहसील कार्यालयात आणला. 

घटना घडल्यानंतर मृतदेह आणताना साडेसात वाजता हा बिबट्या पुन्हा गावकऱ्यांना पुन्हा दिसला. यामुळे गावात प्रचंड भीतीचे वातावरण असून, वनविभागाच्या बोटचेपे धोरणाविरोधात ग्रामस्थांनी ही टोकाची भूमिका घेतली आहे. ग्रामस्थांच्या या आंदोलनात राष्ट्रवादी सह अनेक पक्षांनी उडी घेतल्याने बिबट्याच्या बंदोबस्त करण्याचे आव्हान वनविभागापुढे निर्माण झाले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: jalgaon news chalisgaon leopard killed woman, corpse in tehsil