कुत्र्याच्या चाव्याने जखमी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

जळगाव - शहरातील पिंप्राळा-हुडको परिसरातील ख्वॉजानगर येथील कुत्र्याच्या चाव्याने गंभीर जखमी झालेल्या शाळकरी मुलावर सलग अठरा दिवस उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने त्याला औरंगाबाद येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा आज सायंकाळी मृत्यू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास मुलाचा मृतदेह जळगावात आणण्यात येऊन दफनविधी करण्यात आला.

पिंप्राळा-हुडको परिसरातील ख्वॉजानगर येथील हातमजूर मुश्‍ताक अली यांचा नऊवर्षीय मुलगा आसिफ अली याला २१ डिसेंबरला परिसरातीलच मोकाट कुत्र्याने लचके तोडत गंभीर जखमी केले होते. कुटुंबीयांनी त्याला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयातील श्‍वानदंश विभागात दाखल केले होते. येथे त्याच्यावर चार ते पाच दिवस उपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आले. मात्र, घरी आल्यावर त्याची प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर अवस्थेत आसिफला दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना आज सायंकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, विच्छेदनानंतर त्याचा मृतदेह जळगावात आणण्यात आला. मध्यरात्रीच्या सुमारास पिंप्राळा-हुडकोत पार्थिव आल्यावर या मुलावर मुस्लिम कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला. आसिफ हुडकोतीलच मौलाना अबुलकलाम आजाद उर्दू विद्यालयात पाचवीत शिकत होता. आसिफच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या आईने आक्रोश केला.

परिसरातील मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत आणि शहरातील मोकाट कुत्रे सौखेडा परिसरात सोडले जात असल्याने येथील रहिवाशांसह आसिफ खान भंगारवाले यांनी महापालिकेला निवेदनदेखील दिले होते. 

मात्र, उपाययोजना होत नसल्याने निष्पाप मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Web Title: jalgaon news child death by dog bite