सात लेकरांच्या मातेची मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

जळगाव - उजाड कुसुंबा (ता. जळगाव) येथील किराणा दुकानचालक पतीने चारित्र्याच्या संशयातून पस्तीसवर्षीय पत्नीला पेट्रोल टाकून पेटविल्याच्या घटनेतील जखमी विवाहितेने आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज अखेरचा श्‍वास घेतला. सात लेकरांच्या मातेचा मृत्यू आणि बाप अटकेत, अशा स्थितीत त्यांची अपत्ये पोरकी झाली आहेत. 

जळगाव - उजाड कुसुंबा (ता. जळगाव) येथील किराणा दुकानचालक पतीने चारित्र्याच्या संशयातून पस्तीसवर्षीय पत्नीला पेट्रोल टाकून पेटविल्याच्या घटनेतील जखमी विवाहितेने आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज अखेरचा श्‍वास घेतला. सात लेकरांच्या मातेचा मृत्यू आणि बाप अटकेत, अशा स्थितीत त्यांची अपत्ये पोरकी झाली आहेत. 

उजाड कुसुंबा येथील किराणा दुकानदार अशरफ तडवी याने पत्नी छोटीबाईला गेल्या मंगळवारी (२३ जानेवारी) सकाळी सातच्या सुमारास अंगावर पेट्रोल ओतून पेटविले होते. त्यानंतर जखमी स्थितीत विवाहितेस तिच्या चुलतभावाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर जळीत कक्षात शर्थीचे उपचार गेल्या सहा दिवसांपासून सुरू होते. काल सकाळी साडेसहाला तिने अखेरचा श्‍वास घेतला. दरम्यान, घटनेच्या दिवशीच सहाय्यक निरीक्षक समाधान पाटील, भरत लिंगायत यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेत जखमी छोटीबाईचा जबाब नोंदविला होता. त्यावरून प्रारंभी पती अशरफविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता, त्यातील कलमांत वाढ करून आज अतिरिक्त खुनाचे कलम 
जोडण्यात आले.

सात दिवस वादानंतर पेट्रोलचा भडका  
अशरफ किराणा दुकान चालवतो, तर सोबतीला पत्नी भाजीपाला विकायची. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी छोटीबाई भाजीपाला घेण्यासाठी भाऊ रफिक तडवीसोबत बाजार समितीत पोहोचली. तेथून पती अशरफला घेण्यासाठी सुप्रिम कॉलनी थांब्याजवळ महामार्गावर थांबावे म्हणून फोन करून बोलाविल्याने अशरफ दुचाकी घेऊन तेथे पोहोचला. बराच वेळ होऊनही छोटीबाई आली नाही म्हणून खदानच्या दिशेने उजाड कुसुंब्याकडे तो निघाला असता छोटीबाईला दुसऱ्याच एकाच्या दुचाकीवर बसून जाताना त्याने पाहिले. आठवडाभर याच विषयावर वाद घालून अखेर रागात अशरफने छोटीबाईस पेटविले, त्यातून तिचा आज मृत्यू झाला.

सातही लेकरांच्या पोटाचा प्रश्‍न उपस्थित 
तडवी दाम्पत्यास सहा मुली व मुलगा आहेत. मोठी मुलगी सतरा वर्षांची, तर लहान अपत्य पाच वर्षांचे. या घटनेमुळे आता मुलांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न उपस्थित झाला असून, या जबाबदारीसंदर्भात पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांना विचारणा केली असून, शासकीय यंत्रणेमार्फत निरीक्षणगृहात सोय करण्याचेही सांगण्यात आले आहे.

Web Title: jalgaon news chotibai tadavi death