कर्जमाफीमध्ये दुरुस्त्यांचा खोडा

देविदास वाणी
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

जळगाव - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकरी कर्जमाफी अर्जाच्या ६६ मुद्द्यांवरील माहितीत राहिलेल्या त्रुटी पुन्हा दुरुस्त करण्याचा नवा खोडा आता शासनाने घातला आहे. या दुरुस्त्या करून अपडेट याद्या पुन्हा अपलोड करण्याचे आदेश सहकार विभागाने ‘व्हॉट्‌सॲप’द्वारे काढले आहेत. यामुळे अगोदरच कर्जमाफीच्या अर्जांचे चावडी वाचन, भरलेल्या माहितीचे भाषांतर यामुळे उशीर झाल्यानंतर आता माहिती अपडेट करून भरण्याच्या प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष कर्जमाफी अजून लांबणीवर पडणार आहे. 

जळगाव - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकरी कर्जमाफी अर्जाच्या ६६ मुद्द्यांवरील माहितीत राहिलेल्या त्रुटी पुन्हा दुरुस्त करण्याचा नवा खोडा आता शासनाने घातला आहे. या दुरुस्त्या करून अपडेट याद्या पुन्हा अपलोड करण्याचे आदेश सहकार विभागाने ‘व्हॉट्‌सॲप’द्वारे काढले आहेत. यामुळे अगोदरच कर्जमाफीच्या अर्जांचे चावडी वाचन, भरलेल्या माहितीचे भाषांतर यामुळे उशीर झाल्यानंतर आता माहिती अपडेट करून भरण्याच्या प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष कर्जमाफी अजून लांबणीवर पडणार आहे. 

राज्य शासनाने दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, अशा घोषणा केल्या. दिवाळीच्या एक दिवस अगोदर जिल्ह्यातील तीस शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पत्र, धोतर, साडी- चोळी देऊन सत्कार करण्यात आला. नंतर मात्र कर्जमाफीची प्रक्रिया अधिकच बिकट होत आहे. दिवाळीनंतर कर्जमाफीच्या ग्रीन याद्या अपलोड होतील. ग्रीन यादीत ज्या शेतकऱ्यांची नावे असतील, त्यांच्या बॅंक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होईल, असे शासनातर्फे जाहीर करण्यात आले होते. आज दिवाळी होऊन वीस दिवस उलटले, तरी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या याद्या राज्य शासनाकडे तयार नाहीत.

गेल्या एक व दोन ऑक्‍टोबरला महात्मा गांधी जयंतीला होणाऱ्या ग्रामसभेत कर्जमाफीच्या याद्यांचे चावडी वाचन शासनाने करवून घेतले. नंतर कर्जाबाबत ६६ मुद्द्यांतील माहितीचे लेखा परीक्षण जिल्हा विशेष लेखापरीक्षण विभागातर्फे करवून घेतले. लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतर या माहितीत इंग्रजीतील माहितीचे मराठीत आणि मराठीतील माहितीचे इंग्रजीत भाषांतर करण्याचे आदेश आले होते. हे भाषांतराचे काम दहा दिवस चालले.

दिवाळीनंतर मात्र कर्जमाफीच्या याद्या अपलोड होत नव्हत्या, तो घोळ अद्यापही सुरूच आहे.  कर्जमाफी अर्जातील ६६ मुद्द्यांतील माहिती जर अपूर्ण असेल, तर संबंधित विकास सोसायटीची सीडी अडचण दाखवून अपलोड होत नाही. जिल्ह्यात ८७६ विकास सोसायट्या आहेत. जिल्ह्यात २ लाख ८० हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या अपलोड झालेल्या आहेत. त्यात २ लाख ४६ हजार शेतकरी कुटुंबांच्या ६६ मुद्द्यांतील याद्यांतील माहिती योग्य त्या नमुन्यात भरण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे. प्रत्येक विकास सोसायटीतर्फे शेतकऱ्यांच्या कर्जाच्या माहितीच्या फाइल तयार करून त्या एका सीडीमध्ये टाकल्या आहेत. यात अनेक शेतकऱ्यांनी एकच आधार कार्ड नंबर दिला असेल, आवश्‍यक तेथे माहिती अपूर्ण भरली असेल किंवा योग्य ते उत्तर माहितीत लिहिले नसेल, कर्जाची माहिती एका ठिकाणी वेगळी अन्‌ दुसऱ्या ठिकाणी वेगळी असेल. कर्ज घेतल्याची, शेतकऱ्याची जन्मतारीख योग्य लिहिली नसेल, यासारख्या चुका शोधून नमुन्यानुसारच माहिती भरल्याची खात्री करूनच आता संबंधित शेतकऱ्यांची माहिती अपलोड केली जात आहे.

‘व्हॉट्‌सॲप’वर आदेश
कर्जमाफी याद्यांतील दुरुस्त्या करण्याबाबत सहकार विभागाने आदेश दिले. ते लेखी नाहीत; तर अधिकाऱ्यांच्या व्हॉट्‌सॲप ग्रुपवर आहेत. यामुळे विकास सोसायटीचे सचिव, विशेष लेखा परीक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही कामे करताना नाकी नऊ आले असून, सुटीचे नियोजन कोलमडले आहे.

Web Title: jalgaon news Clearing the amendments in debt waiver