लाचखोर लिपिकास वर्षाची शिक्षा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

जळगाव - वाढीव वेतनाच्या फरकाचे बिल खात्यात जमा करून त्याच्या बदल्यात सरकारी वकिलाकडून लाच मागितल्याप्रकरणी न्यायालयीन लिपिकास दोषी ठरवत एका वर्षाची शिक्षा, तसेच पाच हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.

जळगाव - वाढीव वेतनाच्या फरकाचे बिल खात्यात जमा करून त्याच्या बदल्यात सरकारी वकिलाकडून लाच मागितल्याप्रकरणी न्यायालयीन लिपिकास दोषी ठरवत एका वर्षाची शिक्षा, तसेच पाच हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.

याबाबत सविस्तर माहिती अशी, की तत्कालीन भुसावळ रेल्वे न्यायालयाचे वकील सुभाष विश्‍वनाथ कासार यांच्या वाढीव वेतनाला १ जानेवारी १९९६ रोजी मंजुरी मिळाली होती. वेतनातील फरक मिळण्यासाठी कासार यांनी सरकारी अभियोक्ता कार्यालयाशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला. त्या अनुषंगाने त्यांना मंजूर फरकाचे बिल मिळाले. त्या बद्दल्यात सरकारी अभियोक्ता कार्यालयातील लिपिक सुरेश लक्ष्मण वाणी याने १६ मे २०१४ रोजी सुभाष कासार यांना फोन करून तुमचे काम झाले आहे. फरकाचे बिल खात्यात जमा केले आहे. त्यापोटी त्याने सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत कासार यांच्या तक्रारीवरून ‘एसीबी’ने लाच स्वीकारताना सुरेश वाणी यास अटक करून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल केला होता. 

चौघांच्या साक्षी ठरल्या महत्त्वपूर्ण
या खटल्यात न्यायालयाने तक्रारदार सुभाष कासार, पडताळणी पंच विराज कर्डक, खटला चालविण्यास मंजुरी देणारे सक्षम अधिकारी के. पी. जोशी, तत्कालीन तपासाधिकारी अनिल शिंदे यांच्या महत्त्वपूर्ण साक्षी नोंदवल्या व पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने लाचखोर लिपिक सुरेश वाणी यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली. शिक्षेनुसार दंडातील रक्कम तक्रारदार सुभाष कासार यांना नुकसान भरपाई म्हणून द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले. सरकारपक्षातर्फे ॲड. मोहन देशपांडे यांनी, तर आरोपीतर्फे ॲड. सागर चित्रे यांनी काम पाहिले.

Web Title: jalgaon news crime