आम्हाला तमाशाला पाठवून साधला डाव 

आम्हाला तमाशाला पाठवून साधला डाव 

जळगाव - शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावरील पाथरी (ता. जळगाव) येथील शेतात शेतमालकाच्या मुलाने आदिवासी पावरा समुदायाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (ता.19) रात्री घडली. गावातील जत्रेत असलेल्या तमाशासाठी पीडितेच्या भावासह मेहुण्याला पाठवून शेतमालकाच्या मुलाने पाणी भरण्याच्या बहाण्याने रात्री शेतात येऊन पीडित तरुणीवर अत्याचार केल्याची माहिती घटनेचा प्रत्यक्षदर्शी आणि विहिरीत उडी घेऊन मृत्यूला कवटाळणाऱ्या बहिणीच्या भावाने घडल्या प्रकाराची माहिती देताना सांगितले. 

सतरा वर्षीय मृत तरुणीचा भाऊ आणि तिच्यावरील अत्याचाराच्या घटनेच्या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील मूळ रहिवासी रामसिंग (काल्पनिक नाव) गेल्या चार वर्षांपासून पाथरी (ता. जळगाव) येथील रमेश (तात्या) पाटील यांच्या शेतात सालदारीसाठी नियुक्त आहे. रामसिंग यांचा मुलगा, सून आणि सतरा वर्षीय टीना (काल्पनिक नाव) पाथरीच्या शेतातील झोपडीवर राहून शेतात मोलमजुरी करतात. घटनेच्या रात्री गावजत्रेच्या निमित्ताने गावात तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. पीडित तरुणीचा भाऊ पिरन (काल्पनिक नाव), मेहुणा हे दोघे तमाशा पाहण्यासाठी गावाकडे जात असताना शेतमालकाचा मुलगा विकास पाटील वाटेत भेटला व त्याने आज रात्री शेतात पाणी भरायचे आहे, तुम्ही लवकर परत येणार आहे का, अशी विचारणा केली. मात्र पिरनसह दोघा तिघांनी नाही तमाशा संपल्यावर आम्ही परतू असे सांगत निघून गेले. याच संधीचा गैरफायदा घेत विकास पाटील शेतात आला. त्याने शेतातील झोपडीत वहिनीसोबत झोपलेल्या तरुणी टिनाला उठवून शेजारी नेत अत्याचार करीत असतानाच पिरन व दोघे परतले. घडला घटनाक्रम आणि बहिणीवर अत्याचार होताना पाहिल्यावर पिरनने दमदाटी केल्याने विकासने तेथून पळ काढला. घडला प्रकार मुलीच्या भावाने शेतमालक रमेश तात्या यांना फोन करून सांगितला. मात्र त्यांनी टाळाटाळ केल्याचे पिरनचे म्हणणे आहे. 

मालवाहू गाडीत आला मृतदेह 
शहरापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात अल्पवयीन तरुणीचा विहिरीत उडी घेऊन मृत्यू होतो. मृतदेह बाहेर काढल्यावर पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला. मात्र हा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणताना शववाहिकाच उपलब्ध होत नसल्याने सायंकाळी मालवाहू रिक्षाने मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. 

बहिणीला न वाचविल्याचे शल्य 
पीडित तरुणीने दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.20) शेतातील कठड्यावर उभे राहून उडी घेण्याच्या प्रयत्नात असतानाच तिच्या भावाने धाव घेत कठड्यावरच टिनाला कंबेरतून पकडले. मात्र तिचा पूर्ण झोल विहिरीत गेल्याने एका मागून एक दोघे भाऊ, बहीण विहिरीत पडले. विहिरीत पडल्यावर पिरनच्या पायाला दुखापत झाल्याने तो काही वेळासाठी जायबंदी झाला. इतक्‍यातच टिना पाण्यात बुडाली. कंबरेला दोर बांधून कसेबसे तिला बाहेर काढल्यावर तिचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. एकूणच घटनाक्रम सांगत असताना आपण प्रयत्न करूनही बहिणीला वाचवू न शकल्याचे वारंवार पिरनच्या बोलण्यावरून अधोरेखित होत होते. 

प्रकरण दडपण्यासाठी धडपड 
रात्री इतका मोठा प्रकार शेतात घडला असताना त्याची साधी दखलही शेतमालकाने घेतली नसल्याचे पीडितेचे वडील, वहिनी, मेहुणे व भाऊ अक्रोशित स्वरात सांगत होते. उलट हे प्रकरण कुणालाही सांगू नका. तुमच्यासाठी वाईट होईल, असे सारखे दडपण आणण्यात येत असल्याचे आदिवासी पावरा कुटुंबीयांचे म्हणणे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com