उद्योजकाला मारहाण करून लुटले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

जळगाव - चटई कारखान्यातील कामगारांच्या पगाराचे चार लाख रुपये घेऊन जाणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील उद्योजकास दोन अनोळखी तरुणांनी पाठलाग करून गाठत त्यांच्याकडील चार लाख रुपये लुटून नेले. आर. एल. चौकापासून पाठलाग करताना या चोरट्यांनी बनवट इंडस्ट्रीजवळ संबंधित उद्योजकाचा रस्ता अडवून हा प्रकार केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला असून, उद्योजकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. 

जळगाव - चटई कारखान्यातील कामगारांच्या पगाराचे चार लाख रुपये घेऊन जाणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील उद्योजकास दोन अनोळखी तरुणांनी पाठलाग करून गाठत त्यांच्याकडील चार लाख रुपये लुटून नेले. आर. एल. चौकापासून पाठलाग करताना या चोरट्यांनी बनवट इंडस्ट्रीजवळ संबंधित उद्योजकाचा रस्ता अडवून हा प्रकार केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला असून, उद्योजकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. 

सुप्रिम कॉलनी येथील रहिवासी मंगलसिंह दिवानसिंह पाटील (वय ५३) यांनी औद्योगिक वसाहत परिसरातील डब्लू सेक्‍टरमध्ये तुषार पाटील यांच्या मालकीची चटई कंपनी चालवण्यासाठी घेतली आहे. कंपनीत दर महिन्याला १५ ते २० तारखेदरम्यान कामगारांना वेतन वाटप करावे लागते. यंदाचे वेतन करण्यासाठी मंगलसिंह पाटील यांनी घरून ४ लाख रुपये घेत स्वत:च्या ॲक्‍टिवा (एमएच १९, बीझेड ७००) या दुचाकीने आर. एल. चौफुलीमार्गे कंपनीकडे निघाले होते. 

निर्मनुष्य परिसराचा फायदा 
निर्मनुष्य परिसर असल्याने त्याचाच चोरट्यांनी फायदा घेतला. याठिकाणी आरडाओरड केल्यावरही कुणीही मदतीला आले नाही. रस्त्याने जाणाऱ्या शंकर मिस्तरी यांना घटना सांगितल्यावर त्यांनी माझ्या कंपनीत फोन करून मुलांना मदतीसाठी बोलावले. याप्रकरणी मंगलसिंह पाटील यांच्या तक्रारीवरून औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून रात्री चोरट्यांच्या शोधार्थ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलन करण्यात आले असून चोरट्यांचा शोध सुरू आहे. 

दुचाकी लावून रस्ता अडवला 
डब्लू सेक्‍टरकडे वळण घेतल्यावर बनवट इंडस्ट्रीजवळच मागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ॲक्‍टिवा स्कूटरसमोर दुचाकी आडवी लावून रस्ता अडवला. दुचाकीवर बसलेल्यांपैकी जाडसर बुटका अंगात लाल रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची जिन्स पॅंट घातलेल्या तरुणाने पाटील यांची कॉलर धरत मारझोड करण्यास सुरवात केली. गाडीची चावी काढून घेत दोघांनी बेदम मारहाण केल्यावर ॲक्‍टिवाच्या डिक्कीत ठेवलेल्या ४ लाख रुपयांची रोकड काढून दोघेही त्यांच्या दुचाकीवर बसून पुन्हा आर. एल. चौफुलीच्या दिशेने सुसाट निघून गेले. 

‘चैन स्नॅचिंग’नंतर ‘बॅग लिफ्टिंग’ची गॅंग 
गेल्या पाच- सहा दिवसांपासून शहरात एकामागून एक मंगळसूत्र लांबविण्याच्या घटनांना ऊत आला होता. त्यामुळे पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या सूचनेवरून शहरात सलग नाकाबंदी करून वाहन तपासणी सुरू झाली होती. वाहन तपासणी आणि नाकाबंदीचा धसका घेत चोरट्यांच्या गॅंगने माघार घेत चोऱ्या थांबविल्या होत्या. आज मात्र नाकाबंदी शिथिल झाली असताना चोरट्यांनी एका घटनेत चक्क ऑटोरिक्षाचा वापर करून वयोवृद्धाला लुटले असून, बॅग चोरी करणाऱ्या टोळीतील संशयितांनी चटई उद्योजकाचे चार लाख रुपये मारहाण करून पळविले आहे. परिणामी, शहरात लागलेल्या सीसीटीव्हीचाही आता चोरट्यांना धाक राहिला नसून चोरट्यांच्या टोळ्या सर्रास भरदिवसा लूटमार करू लागल्या आहेत.

Web Title: jalgaon news crime loot