संविधान जागर मेळाव्यातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

जळगाव - शहरातील लोकशाहीवादी नागरिक मंचतर्फे आज शहरात संविधान जागर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवानी व दिल्ली येथील कन्हय्या कुमार यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार होता. मात्र, कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाने मेळाव्याला परवानगी नाकारली होती. तरीदेखील लोकशाहीवादी मंचने हा कार्यक्रम रद्द न करता रेल्वेस्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाचे वाचन केले, तसेच घोषणा देत आंदोलन केले.

जळगाव - शहरातील लोकशाहीवादी नागरिक मंचतर्फे आज शहरात संविधान जागर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवानी व दिल्ली येथील कन्हय्या कुमार यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार होता. मात्र, कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाने मेळाव्याला परवानगी नाकारली होती. तरीदेखील लोकशाहीवादी मंचने हा कार्यक्रम रद्द न करता रेल्वेस्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाचे वाचन केले, तसेच घोषणा देत आंदोलन केले. जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असल्याने पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. 

लोकशाहीवादी नागरिक मंचतर्फे आज जळगावात संविधान जागर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे आज गुजरात येथील नवनियुक्त दलित समुदायाचे आमदार जिग्नेश मेवाणी, दिल्ली येथील तरुण कार्यकर्ता कन्हय्या कुमार या दोघांच्या प्रमुख उपस्थित गेल्या दोन महिन्यांपासून कार्यक्रमाची तयारी सुरू होती. नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणावर त्यासाठी तयारी देखील करण्यात येत होती.

याच दरम्यान कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ पाळण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रात बंद’मध्ये हिंसक घटना घडल्या. परिणामी जिल्हा पोलिस दलाने कार्यक्रमासाठी दिलेली परवानगी रद्द केली होती. मात्र लोकशाहीवादी नागरिक मंचच्या कार्यक्रमात बदल होऊन आज रेल्वेस्थानक परिसरात संविधान जागर मेळावा घेण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्रित येत संविधानाचे वाचन केले. तसेच यावेळी घोषणाबाजी देखील केली. जिल्ह्यात जमाव बंदी आदेश असल्याने मात्र पोलिसदलाने आंदोलक कार्यकर्त्यांना तातडीने ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिस अधिनियम अंतर्गत अटक करून सायंकाळी सुटका करण्यात आली. 

पोलिसांचा तगडा बंदोबस्त  
रेल्वेस्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह परिसरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.  उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्यासह गोपनीय शाखेचे अधिकारी, कर्मचारी यावेळी तैनात होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‌भवू नये, यासाठी रेल्वेस्थानकासमोरील रिक्षा थांब्याला हलविण्यात येऊन एकही रिक्षा पोलिसांनी या परिसरात लावू न दिल्याने केवळ आंदोलक आणि पोलिस अशीच परिस्थिती होती. 

सोनाळकरांसह इतरांना अटक, सुटका
पोलिस कर्मचारी भालचंद्र देसले यांच्या फिर्यादीवरून शेखर सोनाळकर, प्रकाश चौधरी, अहमद रफिक शेख अब्दुल्ला, होनाजी चव्हाण, प्रतिभा शिरसाठ, गायत्री सोनवणे, चारुलता सोनवणे, सीताराम देवरे, सुभाष कोळी, फिरोज पिंजारी, रफयोद्दीन खान मास्टर, पराग घनश्‍याम कोचुरे, फहिम अहमद पटेल, संतोष सुर्वे, सागर सुर्वे, गौतम सपकाळे, पंकज पवार, प्रसाद तायडे, ऋुषीकेश पाटील, प्रतीक सोनवणे, रोहित तायडे, विकास मोरे, मुकेश पाटील, पीयूष तोडकर, अद्वैत दंडवते, जगदीश बोरसे, प्रणाली सिसोदिया, वैशाली सावरे, वासंती दिघे, कलावती पाटील आदींविरुद्ध मुंबई पोलिस ॲक्‍ट, जमावबंदी आदेश कलम ३७/१(३)चे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात येऊन रात्री सुटका करण्यात आली.

मेवानींची सभा घेणारच
जिग्नेश मेवानींची सभा पुढील महिन्यात घेण्यात येईल, असा निर्धार ‘पीपल्स रिपब्लिकन पार्टी’चे नेते राजू मोरे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की सविधान जागरण मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना पोलिस ठाण्यात अपमानास्पद वागणूक दिली. त्याचा सर्व पुरोगामी संघटनांतर्फे निषेध करण्यात आला. मात्र, आमदार जिग्नेश मेवानी यांची सभा आज पोलिसांनी रद्द केली असली, तरी पुढील महिन्यात त्यांची सभा जळगावात घेण्यात येईलच. यासाठी १५ जानेवारीला सर्व पुरोगामी संघटनांची बैठक बोलाविण्यात येईल.

Web Title: jalgaon news crime on sanvidhan jagar melava activists