पाण्यासोबतची मस्ती पडली महागात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

जळगाव - शहरातील शिवाजीनगर, गेंदालाल मिल आणि भिलपुरा भागातील समवयस्क आठ मित्र पोहण्यासाठी मुर्दापूर (ता. जळगाव) येथील धरणावर पोहायला गेले. यापैकी शेख अक्रम शेख नियाज (वय-१७) याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली. दरम्यान, अक्रमच्या मृत्यूची माहिती कळताच त्याच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. 

जळगाव - शहरातील शिवाजीनगर, गेंदालाल मिल आणि भिलपुरा भागातील समवयस्क आठ मित्र पोहण्यासाठी मुर्दापूर (ता. जळगाव) येथील धरणावर पोहायला गेले. यापैकी शेख अक्रम शेख नियाज (वय-१७) याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली. दरम्यान, अक्रमच्या मृत्यूची माहिती कळताच त्याच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. 

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी - शेख अक्रम याला पोहता येत असल्याने तो उंचावरून सूर मारत होता. अचानक सूर मारल्यावर तो परत आलाच नाही म्हणून मित्रांना शंका आली त्यांनी शोध घेतला. मात्र, मिळून येत नाही म्हणून त्यांनी आरडाओरड करीत मदत मागितली. धरणात मासे पकडणाऱ्यांनीही शोध घेतला, मात्र तरुण मिळून येत नाही म्हणून पोलिसांना पाचारण करण्यात आले. नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आर.टी. धारबळे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. दीड- दोन तासांच्या परिश्रमानंतर अक्रमचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

जिल्हा रुग्णालयात गर्दी 
तरुण धरणात बुडाल्याची माहिती कळताच परिसरातील तरुणांसह मोठ्या प्रमाणावर गर्दी धरणाच्या दिशेने रवाना झाली. मृतदेह जळगावी आणल्यावर जिल्हा रुग्णालयातही तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. रुग्णालयात आत शिरण्यावरुन काहींनी वादही घातला. मात्र, वेळीच पोलिसांचा फौजफाटा मागवण्यात आल्याने वाद निवळला. मृत तरुणावर सकाळी शवविच्छेदन होणार असल्याने पोलिसांनी रुग्णालयात एकवटलेल्या तरुणांनी हळूहळू गर्दी कमी केल्याने तणाव निवळला. 

पावसामुळे मदतकार्यात अडथळे
मुर्दापूर धरणात तरुण बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी पट्टीचे पोहणारे जलसाठ्यात उतरवले, मात्र पाण्याच्या खोलीसह वरून पाऊस सुरू झाल्याने मदतकार्यात प्रचंड अडचणी येत होत्या. तरीसुद्धा तरुणांनी चिकाटी धरत मृतदेह गाळातून शोधून बाहेर काढला. 

हॉकर्स बंदीने ठरला मुर्दापूर प्लॅन 
जळगाव शहरातील हॉकर्स, विक्रेत्यांवर महानगरपालिकेने पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे. अक्रम शेख याचा मोठा भाऊ महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ बर्फगोळ्याची गाडी लावतो, तर दुसरी गाडी वडील बॅंक स्ट्रीटजवळ चालवतात. अक्रम शेख दिवसभर गाडीवर मदतीला राहत होता. एरवी रविवारी खवय्यांची गर्दी उसळत असल्याने त्याला उसंत नसायची. मात्र, गाड्या बंद झाल्याने त्याच्या सोबतचे मित्रही आज रिकामेच होते. म्हणून त्यांनी मुर्दापूर धरणावर पोहण्याचा बेत आखला होता तो अक्रमच्या जिवावर बेतल्याचे त्याच्या जोडीदारांनी सांगितले.

अक्रम शेख बहिणींचा लाडका भाऊ
अक्रम शेख याला सहा भाऊ असून त्यात पाच भाऊ पहिल्या आईचे व दोन भाऊ दोन बहिणी दुसऱ्या आईचे होते. मोठा भाऊ वसीम व दोन सख्या बहिणी आहेत. बहिणींचे विवाह झाले असून त्यांना अक्रमच्या मृत्यूची माहिती कळताच त्यांनी हंबरडा फोडला. मोठी बहीण बलसाड येथून निघाली असून सकाळी पोचल्यावर अक्रमवर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Web Title: jalgaon news death in drown