दिल्लीतील दरोडेखोर पाचोऱ्यात जेरबंद 

दीपक कच्छवा
मंगळवार, 20 मार्च 2018

तीन दिवसांपूर्वी दिल्ली येथील गोपाळगंज भागातील एका गॅस एजन्सीवरील कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून नऊ दरोडेखोरांनी लाखो रुपये लुटून पोबारा केला होता. या दरोड्याची दिल्ली पोलिसात नोंद करण्यात आली होती.

चाळीसगाव : दिल्लीतील गॅस एजन्सीवर दरोडा टाकून शिर्डी येथे देवदर्शनासाठी जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दरोडेखोरांना येथील रेल्वे पोलिसांनी मोठ्या शिताफीने शनिवारी (17 मार्च) रात्री पाचोरा रेल्वे स्थानकावर कुशीनगर एक्‍सप्रेसमधून अटक केली. दरोडेखोरांकडे तीन लाखांची रोकड मिळून आली. 

याबाबत माहिती अशी, तीन दिवसांपूर्वी दिल्ली येथील गोपाळगंज भागातील एका गॅस एजन्सीवरील कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून नऊ दरोडेखोरांनी लाखो रुपये लुटून पोबारा केला होता. या दरोड्याची दिल्ली पोलिसात नोंद करण्यात आली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोर रेल्वेने पसार झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी तत्काळ नागपूर रेल्वे कक्षाला याबाबतची माहिती कळविली. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या सर्व रेल्वे स्थानकावर ही माहिती देण्यात आली. दिल्ली येथील दरोडा प्रकरणातील दरोडेखोर रेल्वे क्रमांक 11016 कुशीनगर एक्‍स्प्रेसने मनमाडकडे जात असल्याची पक्की खबर दरोडेखोरांच्या छायाचित्रासह "सोशल मीडिया'व्दारे पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून पाचोरा रेल्वे स्थानकावरच शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हरविंदसिंग किशोरलाल ठाकूर (वय 35, रा. संजय विहार, नवी दिल्ली), राकेशकुमार कोळी (वय 40, रा. गोविंदपुरी कालकाजी साउथा, नवी दिल्ली व जयविरसिंग बेनीवाल (वय 27, रा. वोखला साउथ, नवी दिल्ली) या तिघांना कुशीनगर एक्‍सप्रेसमधील एस 7 या आरक्षित डब्यातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दरोड्याच्या लुटीतील 2 लाख 81 हजारांची रोकडही जप्त केली. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक सचिन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेश पवार, पोलिस हवालदार ईश्‍वर बोराडे, मधुसूदन भावसार, राजेंद्रसिंह गावित, भास्कर दामोदर, बापू सोनवणे यांनी केली. दरम्यान, तिघा दरोडेखोरांच्या इतर सहा साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.

Web Title: Jalgaon news decoit arrested in pachora