‘डेंग्यू’, ‘स्वाइन फ्लू’सदृश रुग्णांत वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

वातावरण बदलाचा परिणाम; बालकांमध्ये कफ, न्यूमोनियाचे वाढले प्रमाण

जळगाव - ढगाळ वातावरण, कडक उन्हाचे चटके अशा वातावरणातील बदलामुळे ताप- सर्दी- खोकल्यासह अन्य साथरोगांमध्ये वाढ झाली आहे. त्यात प्रामुख्याने बालकांमध्ये कफ, न्यूमोनियाचे प्रमाण वाढले असून, याच आजारांत सर्वाधिक बालकांची संख्या लक्षणीय आहे. याशिवाय, वातावरणातील बदलामुळे अन्य साथीच्या आजारांचे रुग्णही वाढले असल्याने शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णांची संख्या वाढली आहे.

वातावरण बदलाचा परिणाम; बालकांमध्ये कफ, न्यूमोनियाचे वाढले प्रमाण

जळगाव - ढगाळ वातावरण, कडक उन्हाचे चटके अशा वातावरणातील बदलामुळे ताप- सर्दी- खोकल्यासह अन्य साथरोगांमध्ये वाढ झाली आहे. त्यात प्रामुख्याने बालकांमध्ये कफ, न्यूमोनियाचे प्रमाण वाढले असून, याच आजारांत सर्वाधिक बालकांची संख्या लक्षणीय आहे. याशिवाय, वातावरणातील बदलामुळे अन्य साथीच्या आजारांचे रुग्णही वाढले असल्याने शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णांची संख्या वाढली आहे.

पावसाळा आला, की दूषित पाण्यामुळे अनेक साथरोगांना आमंत्रण मिळते; परंतु सध्या पाऊस नसला, तरी वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यातील काही भागांत पाऊस झाला असून, शहरात पाऊस नसला, तरी कधी ढगाळ वातावरण, तर कधी कडक उन्हामुळे प्रचंड उकाडा वाढला आहे. मुख्य म्हणजे या साऱ्या वातावरणात हवेतील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी झाल्याने, त्याचा त्रास बालकांना अधिक प्रमाणात होत आहे. यामुळेच बालकांना कफ, न्यूमोनिया, सर्दी, ताप यांसारख्या आजारांची लागण झाली पाहण्यास मिळत आहे.

न्यूमोनियाचे निम्मे रुग्ण 
हवेतील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी असून, यामुळे घाम अधिक येऊन रोगप्रतिकारक शक्‍ती कमी होत आहे. परिणामी ‘व्हायरल इन्फेक्‍शन’मुळे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. परिणामी शहरातील सर्वच रुग्णालये ‘फुल्ल’ भरली आहेत. यात रोगप्रतिकारक शक्‍ती कमी असल्याने मुले आणि ज्येष्ठांना आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये ६० ते ७० टक्‍के रुग्ण मुले व ज्येष्ठ आहेत. यातच तपासणीसाठी आलेल्यांमध्ये न्यूमोनिया व कफचा त्रास असलेले निम्मे रुग्ण आहेत.

‘डेंग्यू’, ‘स्वाइन फ्लू’ही होतोय ‘डिटेक्‍ट’!
ताप, मलेरिया, न्यूमोनिया यांसारख्या साथीच्या आजारांसोबत ‘डेंग्यू’सह ‘स्वाइन फ्लू’सदृश आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये रोज किमान तीन- चार रुग्ण ‘डेंग्यू’चे आढळून येत असल्याचे डॉ. गंभीरराव पाटील यांनी सांगितले. तसेच ‘स्वाइन फ्लू’सदृश रुग्णदेखील तपासणीदरम्यान निदर्शनास येत असून, तपासण्या करण्यास रुग्णांकडून टाळाटाळ केली जात आहे. यामुळे ‘स्वाइन फ्लू’ आजाराचे रुग्ण असल्याचे समोर येत नाही.

‘चिकुनगुनिया’ काढतोय वर तोंड
साथीच्या आजारांबरोबरच शहरात ‘चिकुनगुनिया’देखील वर तोंड काढू लागला आहे. भोईटेनगर परिसरात दोन ते तीन रुग्ण ‘चिकुनगुनिया’चे असल्याचे माहिती समोर येत आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने नागरिकांनीदेखील काळजी घेणे आवश्‍यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून न्यूमोनिया झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, डेंग्यूचेही रुग्ण ‘डिटेक्‍ट’ होत आहेत. ‘व्हायरल इन्फेक्‍शन’मुळे दिवसभरातून तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून, ही संख्या दोनशेच्या जवळपास आहे.
- डॉ. गंभीरराव पाटील, जनरल फिजिशियन

Web Title: jalgaon news dengue swine flu patient increase