तोकड्या अनुदानामुळे कर्णबधिर मुले शिक्षणापासून वंचित

भूषण श्रीखंडे
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

जळगावः कर्णबधिर विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठीचे वेगळे शैक्षणिक पॅटर्न आहे. मात्र, ते अगदीच मर्यादित स्वरूपाचे असून सोबतच अनुदानही तोकडे असल्याने हे विद्यार्थी चांगल्या शिक्षणापासून वंचित राहत असल्याची बाब समोर आली आहे. तर दुसरीकडे अपंगत्वामुळे पालकांना त्यांच्या संगोपनासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. शासनाने पुढाकार घेऊन या कर्णबधिर विद्यार्थी व त्यांना शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविण्याची आवश्‍यकता आहे.

जळगावः कर्णबधिर विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठीचे वेगळे शैक्षणिक पॅटर्न आहे. मात्र, ते अगदीच मर्यादित स्वरूपाचे असून सोबतच अनुदानही तोकडे असल्याने हे विद्यार्थी चांगल्या शिक्षणापासून वंचित राहत असल्याची बाब समोर आली आहे. तर दुसरीकडे अपंगत्वामुळे पालकांना त्यांच्या संगोपनासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. शासनाने पुढाकार घेऊन या कर्णबधिर विद्यार्थी व त्यांना शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविण्याची आवश्‍यकता आहे.

देशात जन्मणाऱ्या दर एक हजार अर्भकांमागे चार ते पाच मुले बहिरी असतात. इतर कारणांमुळेही सरासरी चार ते पाच मुलांमध्ये बहिरेपणा येतो. ही स्थिती जिल्ह्यातही त्याच प्रमाणात आहे. ऐकू येत नसल्याने अशी मुले बोलू शकत नाहीत. या मुलांवर वेळच्या वेळी उपचार न केल्यास ती कधीही बोलू शकत नाहीत. वयाच्या चार- पाच वर्षांनंतर बालकांची बोलण्याची प्रक्रिया कमी होते. ते समाजात मिसळू शकत नाहीत. भाषा येत नसल्याने विचार प्रकट करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या विकासावर मर्यादा पडतात. दिसायला धडधाकट असणाऱ्या या मुलांना सहानुभूती मिळणेही कठीण असते. बहिरेपणाचे दुखणे दुर्लक्षित आहे. मुलांच्या या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊनच अशा मुलांवर लक्ष केंद्रित केले आहे. कर्णबधिर मुलांचे लवकर निदान करून, त्यांच्यावर उपचार करण्याचा व त्यांचा भाषा विकास करण्याचा प्रयत्न हा कर्णबधिर विद्यालयातर्फे केला जात असतो.

जिल्ह्यात नऊ शाळा
कर्णबधिर मुलांसाठी जळगाव जिल्ह्यात नऊ शाळा असून त्यात 7 अनुदानित व दोन विनाअनुदानित शाळा आहेत. त्यात काही शाळा निवासी तर काही अनिवासी असून जवळपास साडेतीनशे विद्यार्थी आहेत. अनिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना दरमहा शंभर रुपये तर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी 650 रुपये अनुदान मिळते.

अनिवासी शाळेत अनुदान कमी
कर्णबधिर व मूकबधिर अनिवासी शाळेतील कर्णबधिर विद्यार्थ्यांना दरमहा 100 रुपये म्हणजेच वर्षाचे प्रत्येकी हजार रुपये अनुदान मिळते. इतर विद्यार्थ्यांना मोफत गणवेश शासनाकडून देतात पण या विद्यार्थ्यांना ना गणवेश ना मुबलक अनुदान. त्यामुळे पालकांना या विद्यार्थ्यांवर होणारा खर्च पेलवत नाही. त्यामुळे अशा मुलांच्या पालकांपासून तर थेट समाजापर्यंत सर्वच घटक त्यांच्याकडे केवळ सहानुभूतीच्या दृष्टीने पाहता शासनाने या मुलांचा हक्काचे शिक्षण मिळण्यासाठी किमान दहा हजार रुपये तरी शिष्यवृत्ती मिळणे अपेक्षित आहे.

यंत्रसामग्री लवकर मिळत नाही
कर्णबधिर व मूकबधिर शाळांमध्ये मुलांना त्यांच्या भाषेत वेगळ्या पद्धतीने व यंत्राद्वारे शिक्षण दिले जाते. परंतु, शासनाकडून मिळत असलेले यंत्रदेखील लवकर मिळत नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्यास अनेक शिक्षकांना अडचणी सामोरे जावे लागत असल्याची परिस्थिती आहे.

रोजगार उपलब्ध व्हावा
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांना विविध कला शिकविल्या जातात. शाळेतीलच कला शिक्षिका विद्यार्थ्यांना कापडी विविध प्रकारची फुले, वारली पेंन्टिग्ज्‌, फ्लॉवर पॉट सजविणे, आरी वर्क, जरदोसी वर्क, मायक्रेमच्या वस्तू तयार करणे, आकर्षक अशा फ्रेम तयार करणे आदी कला या विद्यार्थ्यांना शिकवून स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करतात. तसेच या मुलांना बस, रेल्वे, विमान आदी ठिकाणी ज्या प्रमाणे प्रवास करण्यात सवलत दिली जाते. त्याच प्रमाणे त्यांना रोजगार व नोकरी देण्यात अधिक सवलती या मुलांना मिळणे अपेक्षित आहे, असे अपंग सेवा मंडळ संचालित मूक बधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ पवार यांनी मत व्यक्त केले.

Web Title: jalgaon news Due to subsidy, deaf children are deprived of education