पाण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात

दीपक कच्छवा
मंगळवार, 20 मार्च 2018

उपोषणाचा इशारा 
​कृष्णापुरी धरणात सद्यःस्थितीत शून्य टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह गुरांच्या पाण्याचाही प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यामुळे कृष्णापुरी तांडा, दरातांडा, वरखेडे तांडा, लोंढे या भागातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पांझण डावा कालव्याच्या गिरणा धरणाच्या पाटचारी क्रमांक नऊद्वारे "कृष्णापुरी'त सोडावे, अन्यथा 26 मार्चपासून ग्रामस्थांसह शेतकरी उपोषणाला बसतील, असा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : कृष्णापुरी (ता. चाळीसगाव) धरणात गिरणा धरणाचे पाणी सोडावे, या मागणीची दखल घेतली जात नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात वरखेडे, लोंढे व विसापूर ग्रामपंचायतींनी ठराव करुन त्याची प्रत पाटबंधारे विभागाला दिलेली आहे. मात्र, या ठरावाला केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे. सद्यःस्थितीत या भागातील पाणीप्रश्‍न बिकट बनला आहे. 

कृष्णापुरी धरण परिसरात सुरवातीपासूनच पाहिजे तसा पाऊस झाला नाही. परिणामी, हे धरण सद्यःस्थितीत कोरडेठाक पडले आहे. हे धरण परिसरातील वरखेडे, विसापूर, लोंढे या गावांसाठी जणू वरदान ठरले आहे. कृष्णापुरी गावाला पाणीपुरवठा करणारी विहिर या धरणातच आहे. मात्र, धरणच आटल्याने विहिरही कोरडीठाक झाली आहे. दुसऱ्या बाजूला गिरणा धरणातून पाटचाऱ्यांना सोडले जाणारे पाणी वाया जात आहे. त्यामुळे हे पाणी कृष्णापुरी धरणात सोडावे, अशी मागणी तिन्ही ग्रामपंचायतींनी यापूर्वीच पाटबंधारे विभागाकडे केली आहे. मात्र, त्याची अद्यापपर्यंत दखलच घेतलेली नाही. 

उपोषणाचा इशारा 
कृष्णापुरी धरणात सद्यःस्थितीत शून्य टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह गुरांच्या पाण्याचाही प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यामुळे कृष्णापुरी तांडा, दरातांडा, वरखेडे तांडा, लोंढे या भागातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पांझण डावा कालव्याच्या गिरणा धरणाच्या पाटचारी क्रमांक नऊद्वारे "कृष्णापुरी'त सोडावे, अन्यथा 26 मार्चपासून ग्रामस्थांसह शेतकरी उपोषणाला बसतील, असा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

Web Title: Jalgaon news farmer agitation in girna dam