वो तुम्हे मस्जिद छोड आयें कभी । 

सचिन जोशी
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

वो तुम्हे मस्जिद छोड आयें कभी । 

वो तुम्हे मस्जिद छोड आयें कभी । 

जळगाव,  : 
दोस्ताना इतना बरकरार रखो कि, 
मजहब बीच में न आये कभी, 
तुम उसे मंदिर तक छोड दो, 
वो तुम्हें मस्जिद छोड आये कभी। 
समाजात केवळ असे शेर, प्रबोधनाची भाषा वापरून भागत नाही, तर प्रत्यक्षात ते आचरणही असावं लागतं. याच सामाजिक सौहार्द आणि हिंदू-मुस्लिम सलोख्याचं दर्शन घडविण्याचा "प्रयास' पिंप्राळ्यातील मित्रमंडळ गेल्या सात वर्षांपासून करतंय. दीड-दोनशे मुस्लिम कार्यकर्ते असलेल्या या मंडळाचा यंदाचा अध्यक्षही मुस्लिम आहे, हे विशेष! 
हिंदूंसाठी सर्वाधिक चैतन्यदायी ठरणाऱ्या बाप्पाच्या उत्सवाला सोमवारपासून (2 सप्टेंबर) प्रारंभ होत असून, सर्व गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. एरव्ही गणेशोत्सवातील बंदोबस्त म्हटला, की संभाव्य संवेदनशीलता लक्षात घेता पोलिस यंत्रणेवर कमालीचा तणाव असतो. परंतु सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन घडविणारी काही आदर्श मंडळे आपापल्या परीने त्यासाठी प्रबोधनाचे प्रयत्न करीत असतात. 

"प्रयास'चा प्रामाणिक प्रयास 
पिंप्राळ्यातील प्रयास मित्रमंडळ हे त्यापैकीच एक. "पिंप्राळ्याचा राजा' म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंडळ सात वर्षांपासून सलोख्याची परंपरा जोपासतेय. मंडळाचे बहुतांश, जवळपास दीड-दोनशे कार्यकर्ते मुस्लिम आहेत. हिंदू तरुणांच्या खांद्याला खांदा लावून ते बाप्पाचा उत्सव साजरा करतात. 

अजानच्या वेळी माईक बंद 
गणेशोत्सवात मुस्लिम तरुणांचा सहभाग हा या सलोख्यातील मोठा भाग. पण प्रयास मंडळालगत अगदी 50 मीटर अंतरावर मशीद आहे. या मशिदीतून दिवसातून ज्या पाच वेळेस अजान दिली जाते, त्या प्रत्येक वेळी गणेश मंडळाचे माईक, स्पीकर बंद ठेवले जातात. मिरवणुकीत शिस्तीचे दर्शन घडवत मुस्लिम भक्तही उत्साहाने सहभागी होतात. यंदा तर मंडळाने झाकीर पठाण यांना मंडळाचा अध्यक्ष केलंय. हेच काम पाहून पोलिस दलातर्फे गेल्या वर्षी आदर्श मंडळाच्या प्रथम पुरस्काराने मंडळास सन्मानित करण्यात आले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon news ganpati