'गिरणा'वरील कामगारांची दिवाळी अंधारात!

शिवनंदन बाविस्कर
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

आमच्या विभागातर्फे कंत्राटदारांना टेंडर दिल्यानंतर तेच आम्हाला कर्मचारी पुरवतात.  त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पेमेंट करण्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांचीच असते. तसा त्यांच्याशी करारच झालेला असतो. कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याने संबंधित कंत्राटदाराला पेमेंट देण्यासंदर्भात आम्ही नोटीस पाठवली आहे.
- एस. जे. माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग.

सहा महिन्यांपासून पगार रखडले; कर्मचारी आर्थिक संकटात

पिलखोड (ता. चाळीसगाव, जळगाव) : गिरणा धरणावर भरती केलेल्या कंत्राटी कामगारांचे पगार गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहेत. याबाबत कंत्राटदाराला वारंवार विनंती करूनही आजतागायत एक रुपयाही या कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांची यंदाची दिवाळी अंधारात जाणार असल्याचे दिसत आहे.

उत्तर महाराष्ट्रातले सर्वात मोठे धरण म्हणून गिरणा धरणाचा लौकिक आहे. या धरणाच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या सुरक्षा रक्षकांवर आहे, त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यांपासून पगार रखडले आहेत. सद्य:स्थितीत हे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. गिरणा धरणावर 11 कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरती केलेले आहेत. यात दोन सुपरवायझर आणि नऊ सुरक्षा कर्मचारी आहेत. बहुतांश कर्मचारी गिरणा धरणावरच स्थायिक आहेत.

सहा महिन्यांचा 'ब्रेक'
2016 च्या सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांचे पगार थकले आहेत. त्यात नोटबंदीच्या काळात कंत्राटदाराने या कर्मचाऱ्यांच्या कामावर अक्षरशः कुऱ्हाड फिरवली होती. पैशांचे कारण पुढे करून कर्मचाऱ्यांना कामावरून सहा महिन्यांसाठी 'ब्रेक' देण्यात आला होता. त्यांना यावर्षी जूनमध्ये पुन्हा कामावर रुजू करून घेतले. मात्र, जूनपासून आतापर्यंतचे चार महिन्यांचे पगार दिलेले नाहीत. मागील वर्षातील 2 महिने आणि आत्ताचे 4 महिने, असे एकूण सहा महिन्यांचे पगार मिळणे बाकी आहे. त्यामुळे कर्मचारी मानसिक आणि आर्थिक चिंतेच्या गर्तेत अडकले आहेत. पैसाच हाती नसल्याने कुटुंबाचा गाडा कसा हाकावा, हा प्रश्न त्यांच्यासमोर सध्या निर्माण झाला आहे.

अवघ्या बारा दिवसांवर दिवाळीसारखा सण येऊन ठेपला आहे. या कर्मचाऱ्यांना पैशांअभावी दिवाळी साजरी करावी लागणार असल्याचे दिसत आहे. संबधित कंत्राटदाराला वारंवार फोन करूनही कर्मचाऱ्यांना कुठलाच प्रतिसाद देत नसल्याने सर्व कर्मचारी हताश झाले आहेत.

कंत्राटदाराचे घुमजाव
वास्तविक, शासनाकडून ज्यावेळी कंत्राटदारांना टेंडर दिले जाते. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भातही करार झालेला असतो. त्यामुळे नियमित पगार करण्याची सर्वस्वी जबाबदारी कंत्राटदाराची असते. असे असताना सुरक्षा रक्षकांना या कंत्राटदाराने अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याचे दिसत आहे. पगारासंदर्भात काही कर्मचाऱ्यांनी कंत्राटदाराशी संपर्क साधल्यानंतर असमाधानकारक उत्तरे देऊन घुमजाव केले जात असल्याचा अनुभव या कर्मचाऱ्यांना येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधीसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

अधिकृत ऑर्डरविनाच करताहेत काम
कंत्राटी कामगार म्हणून भरती करण्यात आलेल्या गिरणा धरणावरील कर्मचाऱ्यांना अद्याप कुठल्याही प्रकारची लेखी ऑर्डर मिळालेली नाही. त्यांना केवळ 'सुरक्षारक्षक' असल्याचे साधे ओळखपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे नोकरीची अगोदरच शाश्वती नसतानाही सर्व कर्मचारी ऑर्डरविनाच काम करीत आहेत. प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांची दिवाळी साजरी होण्यासाठी तरी पगार करावेत, अशी मागणी होत आहे.

Web Title: jalgaon news girna dam employee no payment before six moonth