न्यायालयाच्या वॉरंटनंतर दर्जी यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

जळगाव - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २००० मधील परीक्षेदरम्यान झालेल्या घोटाळ्यातील संशयित गोपाल दर्जी यांना वारंवार वॉरंट बजावूनही ते न्यायालयात हजर न झाल्याने अखेरीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज त्यांना गोलाणी संकुलातील दर्जी क्‍लासेसमधून अटक केली. 

जळगाव - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २००० मधील परीक्षेदरम्यान झालेल्या घोटाळ्यातील संशयित गोपाल दर्जी यांना वारंवार वॉरंट बजावूनही ते न्यायालयात हजर न झाल्याने अखेरीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज त्यांना गोलाणी संकुलातील दर्जी क्‍लासेसमधून अटक केली. 

या प्रकरणाची पार्श्‍वभूमी अशी, की एमपीएससी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुण वाढवून देण्यासाठी कर्णिक व आयोगाच्या तत्कालीन बारा सदस्यांनी विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (३३/२००२) मुंबईत गुन्हा दाखल केला होता. आयोगाचे अध्यक्ष असताना कर्णिक यांनी एमपीएससी परीक्षेला बसलेल्या ३९८ विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. 

वॉरंट बजावून हजर नाही
आयोगाच्या तेरा सदस्यांसह संशयितांमध्ये जळगाव येथील पद्माकर जैन व गोपाल दर्जी या दोघा संशयितांचा समावेश आहे. मुंबईतील विशेष जिल्हा न्यायालय क्र.-४५, न्या. ए. डी. तन्खीवाले यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज सुरू आहे. कामकाजाला हजर राहत नाही म्हणून विशेष न्यायालयाने गोपाल दर्जी व पद्माकर जैन या दोघांचे अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते. 

‘एसीबी’चा सापळा 
लाचलुचपत विभागाला न्यायालयाचा वॉरंट प्राप्त झाल्यावर, संशयित रामानंदनगर हद्दीतील असल्याने, त्यांना संशयित अटक करण्यासाठी वॉरंट पाठवला जाणार होता. मात्र, तत्पूर्वीच उपअधीक्षक पराग सोनवणे यांना एमएपीएसी घोटाळा प्रकरणाचे वॉरंट असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी गांभीर्य ओळखत स्वत: अटकेचा निर्णय घेतला. मंगळवारी दुपारी एसीबीच्या पथकाने गोलाणी संकुल येथे सापळा रचला. आधी दोघा कर्मचाऱ्यांनी जाऊन त्यांनी चौकशी केली, मात्र दर्जी सर नसल्याचे तेथून सांगण्यात आले. परत वेगळे दोन कर्मचारी पाठवून खात्री करण्यात आल्यावर गोपाल दर्जी तेथे मिळून आले. त्यांना रीतसर ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीअंती अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात दर्जी यांना यापूर्वीही अटक झाली होती. तेव्हा त्यांना सहा महिने कारागृहात ठेवण्यात आले होते.

Web Title: jalgaon news gopal darji