सुरक्षित वाहतूक सप्ताहाचा सरकारला पडला विसर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

केंद्रीय परिवहन मंत्रालयाकडून सुरक्षित वाहतूक सप्ताह साजरा करण्याबाबत तारीख कळविण्यात येते, ती यंदा अद्याप आलेली नाही. तरीही स्थानिक ठिकाणी आम्ही सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने विविध उपक्रम सातत्याने राबवत आहोत. 
- जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव 

जळगाव - रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या नियंत्रणात येत नसताना जनजागृती म्हणून दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या सुरक्षित वाहतूक सप्ताहाला जानेवारी संपत आल्यानंतरही मुहूर्त सापडलेला नाही. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन विभागाकडून यासंदर्भातील तारखाच अद्याप न आल्याने स्थानिक प्रशासन या तारखांच्या प्रतीक्षेत आहे, तर यानिमित्त सुरक्षित वाहतुकीबाबत सरकारची अनास्थाच दिसून येत असल्याचे बोलले जात आहे. 

केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक, परिवहन मंत्रालयातर्फे दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातील तारखा जाहीर करून रस्ते सुरक्षेबाबत सुरक्षित वाहतूक सप्ताह राबविण्याची प्रथा आहे. रस्त्यांवरील वाढती वाहने, वाहनांची गतिमानता आणि त्यामुळे दुपदरी महामार्गांचे चौपदरी मार्ग झाल्यानंतरही कमी न होता उलटपक्षी वाढलेल्या अपघातांवर नियंत्रणासाठी वाहनधारकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने हा सप्ताह दरवर्षी साजरा केला जातो. या ंतर्गत शाळा-महाविद्यालयांमधून मार्गदर्शनपर व्याख्याने, पोस्टर-निबंध स्पर्धा, वाहन परवाना शिबिरासह वाहन तपासणी, कागदपत्रांची पडताळणी असे अनेकविध उपक्रम राबविले जातात. दरवर्षी या उपक्रमांना वाहनधारकांमधून चांगला प्रतिसादही मिळतो. 

यंदा मुहूर्तच सापडलेला नाही 
यंदा सुरक्षित वाहतूक सप्ताहासाठी सरकारला अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही. जानेवारीत होणाऱ्या या सप्ताहाच्या तारखा केंद्र सरकारचे रस्ते वाहतूक व परिवहन मंत्रालय जाहीर करते, त्यासंबंधी स्थानिक म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रादेशिक अथवा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलिस वाहतूक शाखेस तारखा कळविल्या जातात व त्यानुसार आठवडाभर त्यासंबंधीचे उपक्रम राबविले जातात. यंदा मात्र, अशाप्रकारच्या तारखा अद्याप कळविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे हा सप्ताह राबविण्याची जानेवारीतील प्रथा खंडीत झाली आहे. 

सरकारची अनास्था 
देशभरात दुपदरी महामार्गांचे चौपदरी मार्गांमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया वेगाने सुरु आहेत, त्यासाठी स्वत: केंद्रीयमंत्री नितीन गडकरी कमालीचे सकारात्मक असून त्यांचे या विषयातील कामही झपाट्याने सुरु आहे. रस्ते अपघातांबाबत जनजागृती करण्यासाठी म्हणूनही गडकरी क्रियाशील असून त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्नही सुरु आहेत. असे असताना, सुरक्षित वाहतूक सप्ताह आयोजनाबाबत अद्याप कोणत्याही स्तरावर हालचाली दिसत नसल्याने याबाबत सरकारचीच अनास्था आहे, असे बोलले जात आहे.

Web Title: jalgaon news The government has lost the safe transport week