‘जीएसटी’च्या सॉफ्टवेअरअभावी व्यापाऱ्यांनी ठेवले व्यवहार बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

जळगाव - देशभरात कालपासून ‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांकडे ‘जीएसटी’ युक्त बिल देण्याचे सॉफ्टवेअर नाही. यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी आज विक्री बंद ठेवली. केवळ दहा टक्केच व्यापाऱ्यांनी ‘जीएसटी’चे सॉफ्टवेअर वापरून बिले दिली आहेत. बिलांमध्ये अडचणी येत असल्याच्या प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्‍त केल्या आहेत. 

जळगाव - देशभरात कालपासून ‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांकडे ‘जीएसटी’ युक्त बिल देण्याचे सॉफ्टवेअर नाही. यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी आज विक्री बंद ठेवली. केवळ दहा टक्केच व्यापाऱ्यांनी ‘जीएसटी’चे सॉफ्टवेअर वापरून बिले दिली आहेत. बिलांमध्ये अडचणी येत असल्याच्या प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्‍त केल्या आहेत. 

व्यापार दहा टक्केच! 
प्रवीण पगारिया (अध्यक्ष, दाणाबाजार व्यापारी असोसिएशन) - आजपासून ‘जीएसटी’ करप्रणालीद्वारे व्यापार सुरू झाला. ‘जीएसटी’चे सॉफ्टवेअर अनेक व्यापाऱ्यांकडे अद्यापही उपलब्ध झालेले नाही. यामुळे ‘जीएसटी’चे बिल कसे देणार ? यामुळे अनेकांनी वस्तू, मालाची विक्री बंद ठेवली होती. जीएसटी’च्या बिलांअभावी व्यवहार कसे करावेत याबाबत संभ्रम आहे.

निम्मे व्यवहार ठप्प
प्रेम कोगटा (अध्यक्ष, जळगाव जिल्हा दालमिल असोसिएशन) - अनेक दालमिल उद्योजकांना बिले कशी तयार करावीत याची माहिती नाही. काहींकडे ‘जीएसटी’ क्रमांक नाही, यामुळे मालाची विक्री कशी करावी? असे प्रश्‍न आहेत. यामुळे आज व्यवहार बहुतांश बंद होते. ज्यांच्याकडे जीएसटी’चा क्रमांक आहे, बिले देण्याची यंत्रणा आहे. त्यांनी मालाची विक्री केली. आजही पन्नास टक्के उलाढाल बंदच होती.

कपड्यांवर भरला ‘जीएसटी’
वसंतराव पाटील (ग्राहक) - ‘जीएसटी’चा घरगुती वस्तूच्या दरात परिणाम झालेला नाही. किराणा खरेदी केला. त्या वस्तूंवर जीएसटी लागू नसल्याने आनंद झाला. कपड्यांच्या दुकानांत मात्र ‘जीएसटी’ भरावा लागला. ब्रॅंडेड कपडे मी खरेदी केले आहे. 

चित्रपट कमी पाहू
तुषार मराठे (युवक) - युवकांना चित्रपट पाहण्याची हौस असते. आजपासून शंभर रुपयांच्या आतील तिकिटांना १८ टक्के व त्यावरील तिकिटांना २८ टक्के जीएसटी लागू झाल्याने आमच्या खर्चात वाढ होणार आहे. किमान आठवड्याला एक चित्रपट मी पहात होतो. तो आता बंद करावा लागेल. सिनेमागृहात गेले की किमान तीनशे ते पाचशे रुपये खर्च होतो. तो आता वाढणार आहे. 

आर्थिक बजेट बिघडेल
श्‍वेता गुळवे (गृहिणी) - खाण्यापिण्याचे पदार्थांना ‘जीएसटी’ लागू नसल्याने बरे वाटले. मात्र टीव्ही, फ्रिज सारख्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तू महाग झाल्याने ‘बजेट’ थोडे बिघडणार आहे. टूथपेस्ट, ब्रश, पावडर, बटण या वस्तूंवर ‘जीएसटी’ नको होता. मात्र काही वस्तू स्वस्त तर काही महाग झाल्याने कही खुषी कही गम’असेच म्हणावे लागेल.

सौंदर्यप्रसाधनांच्या किमती वाढल्या
उमा पाटील (युवती) - युवती, महिलांना लागणारी सौंदर्य प्रसाधने महाग झाली आहेत. पूर्वी २६ टक्के टॅक्‍स होता तो आता २८ टक्के झाला आहे. स्पर्धेच्या युगात युवती, महिला सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य प्रसाधने वापरतात. किमान या वस्तूंच्या किमती कमी होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही.

ज्वेलरी महागली
मयूरी तडवी (युवती) - सौंदर्यप्रसाधनांच्या किमती वाढायला नको पाहिजे होत्या. सोने, चांदी, इमिटेशन ज्वेलरी महाग झाल्या आहेत. इमिटेशन ज्वेलरी सर्वसामान्य घरातील महिलांना वापरणे परवडणारे होते. त्यावर १.८ टक्के जीएसटी लागला आहे. पादत्राणे स्वस्त झाल्याचा आनंद आहे.

Web Title: jalgaon news GST