पतसंस्था बुडविणाऱ्यांना सोडणार नाही - गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

जळगाव - राज्यभरात गेल्या दशकात पतसंस्थांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. पतसंस्था संचालकांनी आपापल्या नातेवाइकांना मोठ्या प्रमाणात नियमबाह्य कर्ज वाटप केल्याने अनेक संस्था डबघाईस आल्या.

सहकार राज्यमंत्री झाल्यापासून डबघाईस आलेल्या सर्व पतसंस्थांची धुळीने माखलेली दप्तरे आता बाहेर काढली आहेत. या पतसंस्थांची चौकशी सुरू असून, पतसंस्था बुडविणाऱ्या एकाही धेंडाला सोडणार नाही, असा इशारा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिला.

जळगाव - राज्यभरात गेल्या दशकात पतसंस्थांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. पतसंस्था संचालकांनी आपापल्या नातेवाइकांना मोठ्या प्रमाणात नियमबाह्य कर्ज वाटप केल्याने अनेक संस्था डबघाईस आल्या.

सहकार राज्यमंत्री झाल्यापासून डबघाईस आलेल्या सर्व पतसंस्थांची धुळीने माखलेली दप्तरे आता बाहेर काढली आहेत. या पतसंस्थांची चौकशी सुरू असून, पतसंस्था बुडविणाऱ्या एकाही धेंडाला सोडणार नाही, असा इशारा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिला.

जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची अर्थात ग. स. सोसायटीतर्फे आदर्श शिक्षक, गुणवंत सभासद पाल्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, आमदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, महापौर ललित कोल्हे, जेडीसीसी बॅंकेचे संचालक डॉ. सुरेश पाटील, सहकार गटाचे अध्यक्ष बी. बी. पाटील, अध्यक्ष विलास नेरकर, उपाध्यक्ष कैलासनाथ चव्हाण, सुभाष देशमुख यांच्यासह सहकार गटाचे श्रेष्ठी व ग. स. सोसायटीचे संचालक व्यासपीठावर उपस्थित होते. ज्येष्ठ सभासद, ठेवीदार सभासद, वर्गणीदार सभासद, आदर्श शिक्षक, ग्रामसेवक, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सभासद पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

राज्यमंत्री पाटील म्हणाले, की पतसंस्थांच्या गोंधळातही ग. स. सोसायटीच्या नावलौकिकात अधिक भर पडली आहे. सोसायटीत एकही विरोधक नसल्याने सोसायटीची यशस्वीरीत्या घोडदौड सुरू आहे. बी. बी. आबांची कलाकारी भारी असून, त्यांनी एकही विरोधक सोसायटीत शिल्लक ठेवला नाही. (यावेळी सभागृहात हशा पिकला.) परंतु, विरोध असल्याशिवाय काम करण्यात मजा येत नाही. पतसंस्थेची शंभर टक्के वसुली आहे.

आमच्यासारख्या पुढाऱ्यांना कोणीही कर्ज देत नाही आणि ग. स. सोसायटीत सभासदांना कागदपत्रे दिल्यानंतर अवघ्या एका तासात कर्ज मिळते, ही कौतुकास्पद बाब आहे.

सहकार गटाचे प्रमुख पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सोसायटीचे अध्यक्ष नेरकर यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या उल्लेखनीय कार्याचा लेखाजोखा मांडून लवकरच सभासदांसाठी सोसायटीच्या माध्यमातून अद्ययावत आरोग्यसेवा देण्याचा मानस व्यक्त केला. सोसायटीचे संचालक अजबसिंग पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

सहकारात विश्‍वासार्हता महत्त्वाची
राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की पतसंस्थावाल्यांनी मोठ्या प्रमाणात नातेवाइकांना विना गॅरंटी कर्ज वाटले, त्यामुळे त्या अडचणीत आल्या. त्यात कर्जाची वसुली नाही, संस्था कशी वाढणार? सहकार क्षेत्रात विश्‍वासार्हता महत्त्वाची आहे. जनता बॅंकेच्या सभासदांचा डॉ. आचार्य यांच्यावर विश्‍वास होता, त्यामुळे बॅंक बुडाली नाही. सहकार क्षेत्रात कार्य करताना विश्‍वास निर्माण करावा लागतो. तो विश्‍वास ग. स. सोसायटीने निर्माण केला आहे. सध्याच्या परिस्थितीत समाधानी माणूस सर्वांत श्रीमंत आहे आणि हीच श्रीमंती बी. बी. आबांनी मिळविली आहे. त्यांनी सहकारात सोन्यासारखी माणसे निवडली आहेत.

Web Title: jalgaon news gulabrao patil talking