दिव्यांगांसाठी दोन वर्षांत राष्ट्रीय स्तरावरील ‘प्रेरणातीर्थ’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

जळगाव - ‘‘दिव्यांगांनाही सन्मानाने जगता यावे म्हणून हे कार्य आणखी वाढवायचे आहे. देशभरातील दिव्यांगांसाठी ‘प्रेरणातीर्थ’ निर्माणाचा मानस यजुर्वेंद्र महाजन यांनी बोलून दाखविला. त्यानंतर महाजनांसारखे असंख्य कार्यकर्ते तयार व्हावेत आणि त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या ‘प्रेरणातीर्था’साठी एक कोटी रुपये व दोन एकर जागा देण्याची घोषणा रतनलाल सी. बाफना यांनी काल केली.

जळगाव - ‘‘दिव्यांगांनाही सन्मानाने जगता यावे म्हणून हे कार्य आणखी वाढवायचे आहे. देशभरातील दिव्यांगांसाठी ‘प्रेरणातीर्थ’ निर्माणाचा मानस यजुर्वेंद्र महाजन यांनी बोलून दाखविला. त्यानंतर महाजनांसारखे असंख्य कार्यकर्ते तयार व्हावेत आणि त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या ‘प्रेरणातीर्था’साठी एक कोटी रुपये व दोन एकर जागा देण्याची घोषणा रतनलाल सी. बाफना यांनी काल केली.

रतनलाल सी. बाफना फाउंडेशन ट्रस्टतर्फे ‘दीपस्तंभ’चे संचालक व अंध, अपंग बांधवांसाठी मनोबल केंद्राद्वारे कार्य करणारे महाजन यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘आचार्य हस्ती अहिंसा कार्यकर्ता’ पुरस्कार देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रम काल कांताई सभागृहात झाला. कार्यक्रमाला जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी खासदार ईश्‍वरलाल जैन, आमदार सुरेश भोळे, ‘सदाचार- शाकाहार’चे प्रणेते रतनलाल सी. बाफना, शौर्य शुक्‍ला, मोफतराज मुणोत, नवरतनमल कोठारी, पारसमल हिरावत, सुमेरसिंह बोथरा, राजकुमार गोलेच्छा, पुरणमल अबाणी, संघपती दलिचंद जैन, अशोक पटवा उपस्थित होते.

‘मनोबल’च्या विद्यार्थ्यांचा सत्कार
सत्कार स्वीकारताना अश्रूंना वाट करून देत महाजन म्हणाले, की आचार्य यांच्या नावाने असलेला हा पुरस्कार मला मिळतोय, हे मी माझे भाग्य समजतो. मी ज्यांच्यासोबत काम करतोय, असे सर्व ‘मनोबल’चे विद्यार्थी त्या सर्वांचा हा पुरस्कार आहे. माझ्याजवळ पैसा नाही. मात्र, रतनलाल बाफना, भरत अमळकर यांच्यासारखी लाखमोलाची माणसे जुळलेली आहेत व हीच माझी श्रीमंती आहे. या पुरस्कारातून पाच लाख रुपये मिळाले. त्यात मी अजून दहा विद्यार्थी दत्तक घेईल. मनोबल केंद्र अंध, अपंग, दिव्यांगांसाठी ‘प्रेरणातीर्थ’ ठरेल, असे तयार केले जाईल. केंद्रास रतनलाल बाफना हे नाव देण्यात येईल.

नवरतनमल कोठारी म्हणाले, की बाफना यांचे जीवन अहिंसेला समर्पित आहे. आपल्याकडे जे आहे, ते आपण इतरांना देण्याचे काम केले पाहिजे. मोफतराज मुणोत (राजस्थान) म्हणाले, की महाजन यांचे सार्थकी जीवन आहे. त्यांनी स्वतःसाठी दहा टक्के, अंध, अपंग, दिव्यांगांसाठी ९० टक्के जीवन दिले आहे. अंध, अपंग बांधवांना ‘मनोबल’ची गरज असते. ते मनोबल देण्याचे कार्य महाजन करीत असल्याने खऱ्या अर्थाने ते ‘दीपस्तंभ’ आहेत.

पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन रामचंद्र पाटील यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते यजुर्वेंद्र महाजन यांना पुरस्कार व पाच लाख रुपये प्रदान करण्यात आले. महाजन यांच्या परिवाराने हा पुरस्कार स्वीकारला. डॉ. रेखा महाजन, टेकचंद सोनवणे, अमित वाईकर यांनी मनोगत व्यक्त केले. जयदीप पाटील, राजेंद्र चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी चित्रफितीद्वारे दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल केंद्राची माहिती देण्यात आली. ‘मनोबल’च्या संगीता गोसावी, पंकज गिरासे यांनी भावना केल्या.

बाफना परिवाराचा सन्मान
मनोबल केंद्राच्या दिव्यांग व प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांच्या इच्छाशक्तीला उपस्थितांनी सलाम केला. व्यासपीठावरील मान्यवरदेखील यावेळी थक्क झाले. याच केंद्राची दोन्ही हात जन्मापासूनच नसलेल्या ‘लक्ष्मी’ने सर्वांची मने जिंकली. मनोबल व दीपस्तंभ परिवारातर्फे रतनलाल बाफना व त्यांच्या परिवाराचा आगळावेगळा सन्मान करण्यात आला.

पायाने लिहिले सन्मानपत्र
लक्ष्मी हिने पायाने व्यासपीठावर विद्यार्थ्यांतर्फे असलेला संदेश मानपत्रावर प्रत्यक्ष लिहिला. तेच सन्मानपत्र बाफना यांना प्रदान करण्यात आले; तर त्यांनी मनोबल केंद्रासाठी दिलेला मदतीचा हात कायम प्रेरणादायी राहील, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

Web Title: jalgaon news handicap Ratanlal C. Bafna Foundation Trust