अवजड वाहनांमुळे शाहूनगर रस्त्याची दैना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

जळगाव - शाहूनगरचा मुख्य रस्ता अवजड वाहने अन्‌ महापालिकेच्या दुर्लक्षामुळे खड्ड्यात गेला आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने रोज अपघात होत आहेत. रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या गटारी तसेच अस्वच्छतेनेदेखील शाहूनगर भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

जळगाव - शाहूनगरचा मुख्य रस्ता अवजड वाहने अन्‌ महापालिकेच्या दुर्लक्षामुळे खड्ड्यात गेला आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने रोज अपघात होत आहेत. रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या गटारी तसेच अस्वच्छतेनेदेखील शाहूनगर भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

शहरातील दाटवस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहूनगर भागातील मूलभूत सोयी-सुविधांची वानवा दिसत आहे. शाहूनगरातून भोईटेनगराजवळील रेल्वेफाटकाकडून जाणाऱ्या पिंप्राळा रस्त्याची हनुमान मंदिर ते पोलिस चौकीदरम्यान दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यापूर्वी महापालिकेने रस्त्याची दुरुस्ती केली नाही. केवळ बांधकामाचे टाकाऊ साहित्य, मुरूम टाकून रस्त्यातील खड्डे बुजविले; परंतु जवळच असलेल्या मालधक्‍क्‍यातून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचल्याने दुचाकी व पादचाऱ्यांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत.

आरोग्याचा प्रश्‍न गंभीर
रस्त्याच्या बाजूला गेल्या सहा- सात महिन्यांपासून गटार खोदून ठेवल्याने तेथील रहिवाशांना घरातून बाहेर पडणे अडचणीचे झाले आहे. या गटारीत घाण साचून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिसरात साथीचे आजार पसरत असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

अवजड वाहनांनी लावली वाट
शाहूनगराच्या जवळच रेल्वेचा मालधक्का असल्याने दिवस-रात्र या रस्त्यावरून अवजड वाहनांची वर्दळ असते. त्यातच आधीच रस्ता महापालिकेने दुरुस्त न केल्याने वाहनांनी पूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. अवजड वाहनांचा मार्ग वळवावा यासाठी रहिवाशांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, प्रशासनाने दखल घेतली नाही.

खोदलेल्या गटारीमुळे वाढली डोकेदुखी
शाहूनगर रस्त्यावरील हनुमान मंदिर ते पोलिस चौकीदरम्यान महापालिकेने गटार दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या सहा- सात महिन्यांपासून त्या खोदून ठेवल्या; परंतु तेथे प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली नसल्याने गटारीशेजारील रहिवाशांना घराबाहेर पडणे मुश्‍किल झाले आहे. तात्पुरत्या स्वरूपात पत्रे, बांबूच्या मदतीने रस्ता केला आहे. तोही धोकादायक स्थितीत असल्याने जीव धोक्‍यात खालून नागरिक रहिवास करीत आहेत.

आयुक्तसाहेब, शाहूनगरातही या...!
शहरात सर्वत्र स्वच्छतेची पाहणी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी केली. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शाहूनगर भागात असुविधा व अस्वच्छतेच्या पाहणीसाठी प्रभारी आयुक्त आले नसल्याचा आरोप रहिवासी करीत आहेत. ते आले असते तर अनेक समस्या सुटल्या असत्या, अशी भावना परिसरातील रहिवाशांनी व्यक्‍त केली.

Web Title: jalgaon news heavy vehicle