गाळ्यांचा प्रश्‍न तीन दिवसांत मार्गी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

जळगाव - महापालिकेच्या मालकीच्या गाळ्यांचा प्रश्‍न नगरविकास विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याशी बोलून तीन दिवसांत मार्गी लावू, असे आश्‍वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच मुख्यमंत्र्यांनी दिलेला २५ कोटी रुपये निधी कसा खर्च करायचा, याचा निर्णय समितीमधील जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी घ्यावा, असेही श्री. पाटील यांनी आज आढावा बैठकीत सांगितले. 

जळगाव - महापालिकेच्या मालकीच्या गाळ्यांचा प्रश्‍न नगरविकास विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याशी बोलून तीन दिवसांत मार्गी लावू, असे आश्‍वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच मुख्यमंत्र्यांनी दिलेला २५ कोटी रुपये निधी कसा खर्च करायचा, याचा निर्णय समितीमधील जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी घ्यावा, असेही श्री. पाटील यांनी आज आढावा बैठकीत सांगितले. 

महापालिकेच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत आज सायंकाळी साडेसातला अजिंठा विश्रामगृहात आढावा बैठक झाली. महापौर नितीन लढ्ढा, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी निंबाळकर, नगरसेवक नितीन बरडे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्यासह महापालिकेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. प्रारंभी महापौर लढ्ढा यांनी हुडको, उड्डाणपूल आणि गाळ्यांच्या सद्यःस्थितीबाबत माहिती दिली. ‘हुडको’ला कर्जापोटी ७७ कोटी ७५ लाखांचा प्रस्ताव दिला आहे. याबाबत केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा करून तोडगा काढावा, अशी मागणी केली. ‘हुडको’बाबत निर्णय झाल्यास २५ टक्के निधी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या २५ कोटींचा निधीतून भरता येऊ शकतो का, असे विचारणा यावेळी पालकमंत्र्यांनी केली. यावर आमदार भोळे यांनी २५ कोटी मूलभूत सुविधांसाठी आहे, कर्जासाठी नाही, अशी सूचना मांडली. पालकमंत्री पाटील यांनी हुडकोला २५ टक्के निधी भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटा व त्यांच्याकडे पुन्हा निधीची मागणी करा, असे सांगितले. 

उड्डाणपुलांसाठी ‘एनओसी’ देणार
शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम राज्य शासनाचे ५० टक्के आणि केंद्र शासनाचे ५० टक्के खर्चातून होणार आहे. त्याअनुषंगाने निविदा प्रक्रिया सुरू असून ५० टक्के खर्च करण्यासाठी राज्य शासनाची ‘एनओसी’ अद्याप मिळालेली नाही, ती लवकर देण्याची गरज आहे, असे महापौर लढ्ढा यांनी सांगितले. यावर पालकमंत्री पाटील लवकर ‘एनओसी’ दिली जाईल. तसेच पिंप्राळा व असोदा रेल्वे गेट उड्डाणपूल तयार करण्याचा प्रश्‍न मार्गी लावू, असे सांगितले.  

आमदार भोळेंनी वाचला तक्रारींचा पाढा
महापालिकेच्या प्रलंबित प्रश्‍नांवर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार भोळे यांनी शहरातील समस्यांच्या तक्रारींबाबत पाढा वाचला. शहरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. विस्तारित भागांमध्ये गटारी नाहीत. साफसफाई होत नाही. महापालिकेचे अधिकारी ऐकत नाही, असे सांगताच हे विषय येथे मांडायचे नाही, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. 

‘मनपा’तील अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरा 
जळगाव महापालिकेत आयुक्त, शहर अभियंता, वैद्यकीय आरोग्याधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, नगरसचिव, उपायुक्त (सामान्य प्रशासन आणि महसूल), सहाय्यक आयुक्त, अप्पर आयुक्त, मुख्यलेखाधिकारी आणि जीवशास्त्र अधिकारी अशी १४ पदे रिक्त असल्याचे महापौर यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

‘हुडको’च्या कर्जासाठी हा निधी नाही 
मुख्यमंत्र्यांनी २५ कोटींचा निधी मूलभूत सुविधांच्या विकासकामांसाठी दिलेला आहे. ‘हुडको’चे कर्ज भरण्यासाठी नव्हे, असे आमदार भोळे यांनी बैठकीत सांगितले. हा निधी हुडको कर्जफेडीसाठी वापरू नये, तसेच हा निधी जिल्हाधिकाऱ्यांनी विश्‍वासात न घेता महापालिकेकडे तो वर्ग केल्याबाबत पालकमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली.

Web Title: jalgaon news jalgaon municipal corporation