जपानची तांत्रिक सल्लागार समिती शहरात दाखल 

जपानची तांत्रिक सल्लागार समिती शहरात दाखल 

जळगाव - केंद्र शासनाची अमृत योजनेंतर्गत शहरासाठी पाणीपुरवठा, भूमिगत गटारी व मल:निसारण योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे काम सुरू करण्याचे कार्यादेश महापालिकेने देण्यात आले आहेत. लवकरच या कामांना सुरवात होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या योजनेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जपानची चार तज्ज्ञाची समिती आज शहरात दाखल झाली. त्यांनी आज उमाळा येथील जलशुद्धीकरण केंद्र आणि वाघूर धरणाची पाहणी केली असून, एक डिसेंबरपर्यंत शहराची पाहणी करणार आहेत. 

केंद्रशासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी 191 कोटी 86 लाख, भूमिगत गटारी व मलःनिसारण योजनेसाठी 131 कोटी 56 लाख निधी मंजूर आहे. केंद्रशासनाने अमृत योजनेवर तांत्रिक आणि सल्लागार म्हणून "द जपान कौन्सिल ऑफ लोकल ऑथोरिटीज फॉर इंटरनॅशनल रिलेशन, सिंगापूर' (जे क्‍लेअर) या कंपनीची नियुक्ती केली आहे. त्यानुसार योजनेतील कामे प्रभावीपणे होण्यासाठी कंपनीचे तज्ज्ञ आज महापालिकेत दाखल झाले. उपायुक्त चंद्रकांत खोसे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर शहरास सद्या होणाऱ्या पाणीपुरवठा केला जाणाऱ्या उमाळा येथील जलशुद्धीकरण केंद्र, वाघूर धरण येथे प्रत्यक्ष जाऊन आणि त्या-त्या ठिकाणांची पाहणी केली. तसेच शहरातील पाणीपुरवठा जलवाहिनी, तसेच भूमिगत व मलःनिसारण याबाबत कामांची पाहणी करून या कामांबाबत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना, तसेच मंजूर निविदाधारक मक्तेदाराला मार्गदर्शक व सूचना करणार आहेत. 

जलशुद्धीकरण, धरणाची केली पाहणी 
शासनाने अमृत योजनेसाठी तांत्रिक सल्लागार म्हणून नेमलेल्या जपानच्या (जे क्‍लेअर) कंपनीचे तज्ज्ञ मार्गदर्शक आज शहरात आले. त्यांनी महापालिकेचे शहर अभियंता बी. डी. दाभाडे आणि प्रकल्प अभियंता योगेश बोरोले यांना सोबत घेऊन शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या उमाळा येथील जलशुद्धीकरण केंद्र आणि वाघूर धरणाची पाहणी केली. शहरात कोणकोणत्या ठिकाणी जलवाहिनी टाकायची आहे, त्या भागात उद्या (28 नोव्हेंबर) ही समिती पाहणी करणार आहे. संपूर्ण योजनेच्या कामांची पाहणी एक डिसेंबरपर्यंत केली जाणार असून, योजनेबाबत महापालिका अधिकारी व योजनेचे काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. 

अशी आहेत जपानी कंपनीची कामे 
टोकियो येथील "जे क्‍लेअर' ही कंपनी जपानमधील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विविध योजनेवर तांत्रिक सल्लागार म्हणून काम पाहत आहे. टोकियो येथील भूमिगत गटारी, सांडपाणी व प्रक्रिया प्रकल्प हा सर्वांत चांगला प्रकल्प असून या कंपनीच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे. या अनुषंगाने केंद्रशासनाने अमृत अंतर्गत होणारी कामे या तांत्रिक सल्लागार समितीच्या मार्गदर्शनानुसार केली जाणार आहे. 

सदस्यांच्या नावांबाबत अधिकारीच अनभिज्ञ 
जपान येथील अमृत योजनेच्या कामांबाबत तांत्रिक सल्लागार म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी चार सदस्य दाखल झाले. परंतु या सदस्यांपैकी एकाही सदस्याचे नाव महापालिका अधिकाऱ्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत कुणालाही माहिती नसल्याचे माहिती समोर आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com