चाळीसगाव: पुन्हा बिबट्याचा हल्ला; तरुण बचावला

शिवनंदन बाविस्कर
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

वनविभागावर ग्रामस्थांचा रोष अनावर...
​सततचे होणारे हल्ले रोखण्यात वनविभागाला अपयश येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रोजच्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. त्यामुळे स्थानिकांचा वनविभागावर रोष अनावरण झाला असून तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

पिलखोड(ता. चाळीसगाव), ता. 19 : सायगाव(ता. चाळीसगाव) शिवारात बिबट्याची दहशत कायम असून काल(ता. 18) संध्याकाळी पुन्हा पावणे पाचच्या सुमारास बिबट्याने शेतात काम करणाऱ्या तरुणावर हल्ला केला. परंतु प्रसंगावधानाने तो थोडक्यात बचावला. सततचे होणारे हल्ले रोखण्यात वनविभाला अपयश येत असल्याने स्थानिकांचा रोष अनावर झाला आहे.

मंगळवार(ता. 15) पासून काकळणे आणि सायगाव शिवारात होणाऱ्या हल्ल्यांमुळे परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. सततच्या हल्ल्यांची वार्ता कानावर येत असल्याने ग्रामस्थ अक्षरशः रात्र जागून काढत आहेत. शिवाय शेतात रात्रीच काय तर दिवसा सुद्धा कोणीच जाण्यास धजावत नाही. काल(ता. 18)  पुन्हा सायगाव शिवारात संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. बबलू बच्छे हा तरुण शेतात गुरांसाठी चारा कापत होता. त्याला विचित्र आवाज ऐकू आला आणि क्षणात त्याच्यावर झडप घालत हल्ला केला. त्यात त्याच्या प्रसंगावधानाने थोडक्यात बचावला. नाही तर तोही गंभीर जखमी झाला असता, असे बबलू बच्छे या तरुणाने सांगितले.

गावात ही वार्ता क्षणात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे 50 ते 60 ग्रामस्थ घटनास्थळी जमले होते. याआधी नरेश रावते व शंकर बच्छे यांनी त्या प्राण्याला प्रत्यक्ष पाहिले. त्यामुळे या दोन्ही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार तो प्राणी बिबट्याच असल्याचे ते सांगत आहेत. दरम्यान आज संध्याकाळी झालेल्या हल्ल्याची बातमी कळल्यावर वनविभागाचे अधिकारी सायगावला आले होते. त्यांनी प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांचे म्हणणे जाणून घेतले.

वनविभागावर ग्रामस्थांचा रोष अनावर...
सततचे होणारे हल्ले रोखण्यात वनविभागाला अपयश येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रोजच्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. त्यामुळे स्थानिकांचा वनविभागावर रोष अनावरण झाला असून तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Jalgaon news leopard attack in chalisgaon