भारनियमनाचे ‘भूत’ पुन्हा मानगुटीवर!

भारनियमनाचे ‘भूत’ पुन्हा मानगुटीवर!

जळगाव - पावसाअभावी पिकांना पाणी देण्यासाठी आता शेतकरी वीजमोटारी सुरू करीत आहेत. त्याचवेळी उकाड्यातही प्रचंड वाढ झाल्याने पंखे, एअरकंडिशनचा वापरही वाढला. त्यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली. दुसरीकडे कोळशाअभावी राज्यात वीज उत्पादन कमालीचे घटले. परिणामी काही काळ अदृश्‍य झालेले भारनियमनाचे ‘भूत’ पुन्हा जळगावकरांच्या मानगुटीवर बसले आहे. विजेची वाढती गरज आणि उत्पादनातील तूट यांचा मेळ घालण्याचे नियोजन ‘महावितरण’कडून वेळीच न झाल्याने सर्वसामान्यांना या झळा सोसाव्या लागत आहेत.

वीजनिर्मिती केंद्रांना कोळशाची उपलब्धता व पुरवठ्यात अडचणी येत असल्याने, राज्यात तात्पुरते आपत्कालीन भारनियमन करण्यास सुरवात झाली आहे. भारनियमन तात्पुरते असले, तरी ते कधीपर्यंत सुरू राहील, याबद्दल मात्र अनिश्‍चितता आहे. वीजनिर्मिती कंपन्यांसोबत झालेल्या करारानुसार ‘महावितरण’ला ‘महानिर्मिती’कडून सात हजार मेगावॉट व ‘अदानी’कडून तीन हजार ८५ मेगावॉट वीज मिळणे अपेक्षित आहे; परंतु संबंधित कंपन्यांकडून वीजपुरवठा कमी प्रमाणात देण्यात येत आहे; तर दुसरीकडे विजेच्या मागणीतही गेल्या आठ- दहा दिवसांपासून वाढ झाली असून, सद्यःस्थितीत ही वाढ साडेतीन ते चार हजार मेगावॉट इतकी झाली असल्याने आपत्कालीन भारनियमन करण्याची वेळ आली आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

शेतकऱ्यांसमोर प्रश्‍न
गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसानेही दडी मारली आहे. यातच कडक ऊन पडत असल्याने पिकांना पाण्याची आवश्‍यकता भासू लागली आहे. शिवाय, ‘रब्बी’च्या लागवडीसाठी मशागतीलाही सुरवात झाली आहे. उडीद- मुगाचे पीक घेतले गेल्यानंतर जमिनीची मशागत करून भेंडी किंवा मका लागवड करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्याअनुषंगाने जमीन ओलविण्यासाठी वीजमोटारी सुरू केल्या जात आहेत; परंतु ‘महावितरण’कडून नऊ- दहा तासांचे होणाऱ्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांपुढे जमीन ओलविण्याचा आणि पिकांना पाणी देण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मुळात ‘कृषिपंपांना बारा तास वीजपुरवठा’ ही संकल्पना शासनाकडून आली असली, तरी भारनियमनामुळे पुरेशी वीज मिळत नसल्याची समस्या आहे.

भारनियमनाची वेळ अनिश्‍चित
विजेची मागणी वाढल्याने ‘ई’, ‘एफ’ आणि ‘जी’ फिडरवरील तास निश्‍चित करून आपत्कालीन भारनियमन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार अंमलबजावणीही सुरू झाली आहे; परंतु हे भारनियमन कोणत्या वेळेत करावे, याबद्दल निश्‍चिती करण्यात आली नाही. यामुळे दोन टप्प्यांत होणारे भारनियमन कोणत्याही वेळी केले जात आहे. याबाबत माहितीसाठी ‘महावितरण’कडूनही वेळापत्रक आखून देण्याचे काम करण्यात आले नसल्याने नागरिकही संभ्रमात असून, वीजपुरवठा खंडित झाला म्हणजे ‘भारनियमन’ असल्याचे समजले जात आहे.

उन्हाने काहिली अन्‌ भारनियमनाचा चटका!
भाद्रपद महिना सुरू होऊन पंधरा दिवस उलटले असून, आता भाद्रपदातील कडक उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यात ‘ऑक्‍टोबर हीट’चा चांगलाच तडाखा जाणवत असून, आजचे तापमान ३५.८ अंश सेल्सिअसवर होते. उन्हामुळे अंगाची काहिली होत असून, ‘महावितरण’कडून भारनियमनाचाही ‘चटका’ बसत आहे. परिणामी उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com