'कर्जमाफी अर्जांचे "ऑडिट' संथगतीने

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

जळगाव - शेतकऱ्यांनी भरलेल्या कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जांचे लेखापरीक्षण (ऑडिट) संथगतीने सुरू आहे. अर्जांचे चावडीवाचन अवघ्या तीन दिवसांवर आले असताना 1 ते 66 निकषांनुसार भरलेल्या फॉर्ममधील माहितीचे ऑडिट अद्याप पूर्ण झालेले नाही. जळगाव जिल्ह्यात अपलोड झालेल्या दोन लाख 80 हजार कुटुंबांच्या अर्जांपैकी केवळ 86 हजार 154 अर्जांचे ऑडिट आजअखेर झाले आहे. यामुळे सहकार विभाग कधी नव्हे इतका कामाला लागला असून, "काहीही करा; पण 30 सप्टेंबरपर्यंत ऑडिट पूर्ण झालेच पाहिजे; अन्यथा निलंबनासारख्या कारवाईस सामोरे जा,' असा इशारा देणारा आदेशच सहकार विभागाने राज्यातील जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखा परीक्षकांना दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 2 लाख 80 हजार 270 कुटुंबांचे कर्जमाफीचे अर्ज अपलोड करण्यात आले आहेत. सर्व सभासदांच्या कर्जाची माहिती 1 ते 66 नमुन्यानुसार भरून जिल्हा विशेष लेखा परीक्षण विभागाकडे सोपविण्यात आली आहे. विशेष लेखा परीक्षण विभागाने ऑडिटची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी 64 ऑडिटरची नेमणूक केली आहे. त्यांच्या साहाय्यासाठी तेवढेच लिपिकही देण्यात आले आहेत. ऑडिट करण्याचे काम 23 सप्टेंबरपासून सुरू झाले आहे.

Web Title: jalgaon news loanwaiver form audit