मंगळागौर पूजनाची परंपराही झाली आधुनिक; गाण्यांसह खेळही बदलले

धनश्री बागूल
मंगळवार, 25 जुलै 2017

पारंपरिक उत्सवाला व्यवसायाची जोड
आम्ही गेल्या काही वर्षांपासून महिला मंडळांमध्ये गाणी म्हणायचे काम करत आहोत. यात बदलत्या काळानुसार आम्ही गाण्यांमध्ये आधुनिक शब्दांचा वापर केला आहे. त्यामुळे आजच्या पिढीला ती आवडतात व ते त्या गाण्यांचा मनसोक्त आनंद लुटतात.
- आदिती कुलकर्णी (सदस्या, महिला मंडळ)
 

जळगाव : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मंगळागौर पूजन हळूहळू कालबाह्य होत चाललंय. तरीदेखील काही हौशी कुटुंबांमध्ये मंगळागौर साजरी करण्याची परंपरा आजही कायम आहे. मंगळागौरीच्या खेळातून महिलांच्या मनाला आनंद तर मिळतच असतो मात्र शरीराला व्यायामही होतो. आता महिला नोकरी करणाऱ्या असल्यामुळे मंगळागौर जागविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र यावर उपाय म्हणून आजकाल मंगळागौर जागविण्यासाठी, खेळासाठी महिला मंडळे सज्ज झाली असून मंगळागौरीलाही व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. चांगले मानधन मिळत असल्यामुळे जिल्ह्यात अनेक अशी महिला मंडळे काम करत आहे.

सृजनाच्या आविष्कार घडविणाऱ्या श्रावणाला अधिक सार्थ केले आहे ते मंगळागौरीसारख्या पारंपरिक उत्सवांनी. श्रावणातील प्रत्येक मंगळवारी हा पारंपरिक उत्सव साजरा केला जातो. हा आनंदसोहळा म्हटलं तर, प्रामुख्याने महिलांचा पण, त्यात सारे कुटुंबीय केव्हा सामील होतात, ते कळतही नाही. सध्या मंगळागौरीच्या सणाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले असले तरी या सणातील उत्साह मात्र कायम आहे.
यात "नखुल्याबाई नखुल्या, चंदनाच्या टिकुल्या, एक टिकली उडाली, गंगेत जाऊन बुडाली, "किस बाई किस दोडका किस, दोडक्‍याची फोड लागते गोड', अशी अनेक गाणी महाराष्ट्राच्या विविध भागात मंगळागौर पूजनानिमित्त म्हटली जातात.

दोन ते बारा हजारांपर्यंत मानधन
ब्राह्मण महिलांबरोबरच मराठमोळ्या महिलांचे समूहदेखील मंगळागौरीचे खेळ खेळू लागले आहेत. मंगळागौरीच्या खेळासाठी अशा समूहाला आमंत्रित केले जाते. मंगळागौर जागविण्यासाठी अशा मंडळांना दोन ते बारा हजारांपर्यंत मानधन दिले जाते. या मंडळांना शहरासोबतच धुळे, नंदुरबार, नाशिक, मुंबई, पुणे येथे वाढती मागणी आहे. यामुळे मंगळागौरीचे खेळ खेळणाऱ्या मंडळाच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. या मंडळातील महिलांनी सरावाबरोबरच नवीन गाण्यांचा शोध सुरू केला आहे. जुने खेळ आणि या खेळांसाठी गाणी मात्र नवीन अशी काहीशी पद्धत मंगळागौर मंडळामध्ये दिसून येते.

खाद्यपदार्थांची रेलचेल
खेळात आणि गाण्यांमध्ये झालेल्या बदलाप्रमाणेच मंगळागौरीला वाटण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांतही बरेच बदल झाले आहेत. पूर्वी भाजणीचे वडे, मसाला भात, भाजके पोहे, खमंग काकडी आणि मटकीची उसळ हेच पदार्थ दिले जायचे. मात्र आता भाजणीच घरात होत नसल्यामुळे या पदार्थांची जागा चकल्या, गुलाबजाम, श्रीखंड, पुरणपोळी, सॅन्डविच यासारख्या पदार्थांनी घेतली आहे. एवढेच नव्हे तर हे पदार्थही बाहेरून मागविले जातात.

उखाणीही झाली आधुनिक, हायटेक
सध्याच्या या आधुनिक आणि स्मार्ट युगात सर्वच क्षेत्रात बदल होत चालला आहे. असाच बदल उखाण्यांमध्ये ही झाला आहे. जसे की, इलेक्‍ट्रीक नाही, इन्व्हर्टर नाही म्हणून दळण नाही घरात, जुने ते सोने म्हणून पुन्हा जाते फिरवा घरात...!, "कॉम्प्युटरच्या की-बोर्डला जोडलांय माऊस, ---- नाव घेण्याची मला भारी हाऊस..' अशा प्रकारचे उखाणे घेतले जात आहेत.

Web Title: jalgaon news mangalagaur cultural functions