पाच रुपयांत ‘मिनरल वॉटर’ मिळणार कधी?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

जळगाव - रेल्वेस्थानकात आल्यानंतर शुद्ध मिनरल वॉटरची बाटली विकत घ्यायची असेल, तर प्रवाशांना किमान २०-२५ रुपये मोजावे लागतात. मात्र, प्रवाशांना कमी पैशांत शुद्ध आणि थंड पाणी देण्यासाठी रेल्वे प्रशासनानेच पुढाकार घेतला आहे. यासाठीचे ‘वॉटर पॉइंट’ मशिन उभारण्यात आले असले, तरी ते अजून तरी बंदच आहेत. प्रवाशांना त्याचा लाभ कधी मिळणार? याची माहिती रेल्वे प्रशासनाकडेदेखील नाही.

रेल्वेने प्रवास करताना काही प्रवासी घरूनच पाणी आणतात, तर अनेक प्रवासी रेल्वेस्थानकात असलेले ‘प्याऊ’ (पिण्याच्या पाण्याचे नळ) येथून बाटली भरून तहान भागवत असतात. बहुतांश प्रवासी शुद्ध आणि थंड पाण्याच्या दृष्टीने स्थानकातूनच मिनरल वॉटरची बाटली घेत असत. यासाठी प्रवाशांना किमान २० रुपये मोजून पाणी विकत घ्यावे लागते; परंतु स्वस्त दरात ‘मिनरल वॉटर’ उपलब्ध करून देण्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टूरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) पुढाकार घेतला असून, बहुतांश रेल्वेस्थानकांत शुद्ध पाण्याचे केंद्रही सुरू झाले आहेत. मात्र, येथील रेल्वेस्थानकात येणाऱ्या प्रवाशांना या सुविधेचा लाभ मिळण्याची अजूनतरी प्रतीक्षा आहे.

प्लॅटफॉर्मवर दोन मशिन
‘आयआरसीटीसी’ने पुढाकार घेऊन रेल्वेस्थानकात येणाऱ्या प्रवाशांसाठी शुद्ध व थंड पाणी मिळावे यासाठी ‘वॉटर डिस्पेंचर मशिन’ उभारण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून यासाठीचे काम खासगी एजन्सीला देण्यात आले आहे. या एजन्सीमार्फत येथील रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म १-२ आणि ३-४ अशा दोन्ही बाजूंनी दोन- दोन मशिन लावण्यात आले आहेत. या मशिनद्वारे एकाचवेळी पाच व्यक्‍ती पाणी घेऊ शकणार आहेत.

शुद्ध पाणी केंद्र बंदच
रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्मवर शुद्ध थंड पाण्याचे मशिन एजन्सीमार्फत लावण्यात आले असले, तरी अजून ते बंदच आहेत. भुसावळ रेल्वेस्थानकात ही सुविधा प्रवाशांसाठी खुली झाली असून, जळगावला मात्र याची प्रतीक्षा आहे. मशिनमध्ये एक रुपयाचे नाणे टाकून पाहिला असता, नाणे बाहेर निघून आले. पाण्याचे केंद्र कधी सुरू होणार? याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे येथील स्टेशनमास्तर व्ही. एस. कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: jalgaon news Mineral water