लेंडी नालाप्रकरणी सुनावणीपूर्वीच निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

जळगाव - ममुराबाद रस्त्यावरील नाल्याचा प्रवाह बदलल्याप्रकरणी दाखल तक्रारीत महापालिका प्रशासनाने विकसकाने मागणी केलेली कागदपत्रे उपलब्धच करून दिली नसल्याचे स्पष्ट करीत तक्रारीसंदर्भात सुनावणी न घेताच एकतर्फी निर्णय दिल्याचा दावा विकसकाने केला आहे. 

जळगाव - ममुराबाद रस्त्यावरील नाल्याचा प्रवाह बदलल्याप्रकरणी दाखल तक्रारीत महापालिका प्रशासनाने विकसकाने मागणी केलेली कागदपत्रे उपलब्धच करून दिली नसल्याचे स्पष्ट करीत तक्रारीसंदर्भात सुनावणी न घेताच एकतर्फी निर्णय दिल्याचा दावा विकसकाने केला आहे. 

तक्रारदार विजय भास्करराव पाटील यांनी ममुराबाद रस्त्यालगतचा 50 फुटी नाला नैसर्गिक प्रवाहानुसार 100 वर्षांपासून वाहत असून, त्याचा प्रवास बदलल्याची तक्रार केली आहे. मात्र, ही तक्रार करताना कोणताही नकाशा, कागदपत्रे तक्रारदाराने दिलेली नाहीत. उलटपक्षी या नाल्यालगत बांधकाम करीत असताना विकसक म्हणून सर्व प्रकारची परवानगी व महापालिकेकडून रीतसर रक्कम भरून मंजुरी घेतली आहे. तसेच बांधकामास मंजुरी देताना दिलेल्या अटी-शर्तींचे पालन करून बांधकाम सुरू आहे. मंजूर विकास आराखड्यात असलेल्या नकाशानुसार नाल्याचा प्रवाह सुरळीत वाहता केलेला असताना साइटचे वरवर निरीक्षण करून प्रवाह बदलला व नाल्यावर टाकलेला स्लॅब काढून टाकण्याचा एकतर्फी निर्णय देण्यात आला. 

वास्तविक, नाल्याचे बांधकाम करताना लागून असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यावर स्लॅब टाकण्यात आला. त्यामुळे नाल्याच्या प्रवाहास कोणताही अडथळा नाही. उलटपक्षी परिसरातील रहिवाशांची त्यामुळे सुविधा झाली आहे. शिवाय, तक्रारदाराच्या अर्जावर निर्णय घेताना महापालिका प्रशासनाने विकसक म्हणून आमचे म्हणणे ऐकून घेतलेले नाही किंवा कोणतीही सुनावणीही पूर्ण केली नाही. यासंदर्भात आम्ही मागणी केलेले नकाशे, कागदपत्रेही मिळालेली नाहीत, असेही "श्री श्री इन्फ्रास्ट्रक्‍चर'तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नाल्यावरील स्लॅब काढण्याचे आदेश एकतर्फी व अन्यायकारक असल्याचे विकसक श्रीराम खटोड यांनी म्हटले आहे. 

Web Title: jalgaon news municipal