‘मनपा’विरोधात हॉकर्सचा आक्रोश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

जळगाव - महापालिकेने शहरात सुरू केलेल्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईमुळे हजारो विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबाचा पालनपोषणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ही कारवाई त्वरित थांबवा, पर्यायी जागा द्या, या मागण्यासाठी आज हॉकर्सने महापालिकेसमोरील रस्त्यावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. तसेच प्रभारी अप्पर आयुक्त राजेश कानडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.  

जळगाव - महापालिकेने शहरात सुरू केलेल्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईमुळे हजारो विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबाचा पालनपोषणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ही कारवाई त्वरित थांबवा, पर्यायी जागा द्या, या मागण्यासाठी आज हॉकर्सने महापालिकेसमोरील रस्त्यावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. तसेच प्रभारी अप्पर आयुक्त राजेश कानडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शहर महानगराध्यक्ष नीलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी बाराला महापालिकेवर मोर्चा काढला. फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट असोसिएशन, तसेच शहरातील अन्य हॉकर्स व संघटनांनी या मोर्चात सहभाग घेत पाठिंबा दिला. यावेळी महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेमुळे हॉकर्सधारकांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत आमचा मुलांची शाळेची फी आयुक्त भरणार का? अशा शब्दांत हॉकर्सनी तीव्र संताप व्यक्त केला. तर प्रभारी आयुक्तांना निवेदन देऊन आपल्या व्यथा मांडल्या. 

आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी
हॉकर्स आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने महापालिका इमारतीच्या बाजूच्या रस्त्यावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी झाल्याने वाहनधारकांना रस्त्यातून वाहने काढण्यासाठी अर्धा तास वेळ लागला. 

पोलिस - हॉकर्समध्ये शाब्दिक चकमक
मनपाच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना जाण्यास मज्जाव केला. यावेळी महापालिकेचे प्रवेशद्वार, तसेच रस्त्यावर हॉकर्स व आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी आंदोलन समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी शाब्दिक चकमक झाली, परंतु पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना शांत करून शिष्टमंडळाने जाऊन निवेदन द्या, असे सांगितले.  

साने गुरुजी रुग्णालयाच्या जागेवर जागा द्या
अप्पर आयुक्त कानडे यांच्याशी चर्चा करताना राष्ट्रवादीचे पाटील यांनी पालिकेच्या सानेगुरुजी रुग्णालयाच्या रिकाम्या जागेवर, तसेच फुले मार्केटमसोरील रिकाम्या जागेवर हॉकर्सला व्यवसाय करण्यासाठी परवानगी द्या, अशी मागणी केली. परंतु यावर अप्पर आयुक्त म्हणाले, या जागा पार्किंगसाठी राखीव आहेत. पोलिस प्रशासनाने पार्किंगसाठी प्रस्ताव दिला आहे. तुम्ही प्रस्ताव द्या, येत्या स्थायी सभेत तुमच्या प्रस्तावावर चर्चा करू, असे सांगितले. 

‘नो हॉकर्स झोन’ सोडून व्यवसाय करा!
नगरपथाच्या नियमानुसार हॉकर्सचे बायोमॅट्रीक पद्धतीने लवकरच सर्व्हेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे हॉकर्सने ‘नो हॉकर्स झोन’ सोडून व जेथे परवानगी दिलेली आहे तेथे व्यवसाय करावा, त्या जागेवरच हॉकर्सची नोंदणी सर्वेक्षणात होणार आहे, असे अप्पर आयुक्तांनी सांगितले.  यावेळी पाटील यांनी, जोपर्यंत सर्वेक्षण होत नाही, धोरण ठरत नाही तोपर्यंत हॉकर्सना बसू द्यावे, कारवाई करू नये, अशी मागणी केली. 

शहरातील अनधिकृत बांधकामांचे काय?
शहरातील  हॉकर्सतर्फे नीलेश पाटील बाजू मांडताना म्हणाले, की गेल्या वीस दिवसांपासून व्यवसाय बुडाल्याने हॉकर्सवर आर्थिक संकट आले आहे. कुटुंबीयांचे पालनपोषण कसे करावे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. यावर शहरातील मार्केटमध्ये गाळेधारकांनी केलेले अतिक्रमण शहरातील अनधिकृत बांधकामांचे काय? असा सवाल नीलेश पाटील यांनी यावेळी केला.

‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्यांसह दीडशे मार्चेकऱ्यांवर गुन्हे
जळगाव, ता. ५ : शहरातील फुले मार्केटमधील हॉकर्सनी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढला होता. मोर्चेकऱ्यांनी महापालिकेजवळ पोलिसांशी हुज्जत घातल्याने, तसेच रस्त्यावर ठाण मांडून सार्वजनिक वापराचा रस्ता बंद केल्याप्रकरणी नीलेश पाटीलसह एकूण १५० हॉकर्सविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोर्चेकऱ्यांनी महापालिकेसमोर रस्त्यावर बसून रस्ता रोखत पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता पोलिसांशी हुज्जत घातली. यामुळे पोलिस कर्मचारी भालचंद्र देसले यांच्या तक्रारीवरून नीलेश पाटील, हॉकर्स नंदू पाटील, जितेंद्र ऊर्फ जितू वाणी, बापू कोळी, नंदू महाजन, रवींद्र महाजन, मनोज चौधरी, रवी चौधरी, फारुख अहेलकार, रवी उर्फ पिंटू पाटील, इरफान शेख, गोंविदा कुंभार, तौसिफ पठाण यांच्यासह सुमारे १५० आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक निरीक्षक आशीष रोही करीत आहे.

‘मनपा’ कर्मचाऱ्यास हॉकर्सकडून मारहाण
महापालिकेतर्फे गेल्या वीस दिवसापांसून अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरू आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या पथकाने आज सकाळी अकराला नवीन बसस्थानक परिसरात प्रभारी अप्पर आयुक्त राजेश कानडे यांच्या आदेशानुसार कारवाई केली. यात राहुल चौधरी, पप्पू चौधरी, गोपाळ महाजन या विक्रेत्यांचे लोटगाडी, तीन लोखंडी टेबल, लाकडी टेबल, लाकडी स्टूल, गॅस हंडी, दोन गॅस शेगडी, दोन डबे, पातेले, छत्री आदी सामान जप्त केला.

यावेळी या अतिक्रमणधारकांनी सुभाष चौक येथे येऊन सामान का जप्त केला, असा जाब  अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाऱ्यांना विचारला. तसेच कर्मचारी संजय परदेशी यांना चापटा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून या अतिक्रमणधारकांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जैविक कचरा फेकल्याने दंड
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई केली. यात आर्किड हॉस्पिटल यांनी जैविक कचरा बाहेर फेकला म्हणून पाच हजार रुपये दंड केला. तसेच गुंजन मंगल कार्यालय, साई लीला मंगल कार्यालय यांनी उघड्यावर अन्नपदार्थ टाकल्यामुळे त्यांना प्रत्येकी अडीच हजार रुपये दंड करण्यात आला. तसेच शेण रस्त्यात टाकल्याने अभिमान हटकर यांना हजार रुपये दंड केला.

Web Title: jalgaon news municipal oppose hockers agitation