मातेने टाकलेल्या ‘त्या’ नवजात शिशूला हृदयरोगाचे निदान

मातेने टाकलेल्या ‘त्या’ नवजात शिशूला हृदयरोगाचे निदान

मातृहृदयी कर्मचारी-पोलिसांनी स्वीकारली जबाबदारी

जळगाव - महिन्यापूर्वी नवजात शिशूला सोडून पलायन करणाऱ्या परप्रांतीय महिलेविरुद्ध  गुन्हा दाखल होऊन शोध सुरू असताना ती महिला आलीदेखील... मात्र, नंतर पुन्हा गायब झाली... त्या महिलेच्या मातृहृदयाला बाळाविषयी ‘पाझर’ फुटला नाहीच... अखेर दहा दिवस नवजात शिशू अतिदक्षता विभागाने उपचारांतर्गत बाळाला हृदयरोग असल्याचे निदान झाले अन्‌ रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलिसांच्या मातृहृदयी प्रेमाने या बाळाच्या उपचाराची जबाबदारी स्वीकारत सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय दिलाय...

माता, कौन... पिता कौन, नही है पता...!
देखा नहीं, सुना नही नाम किसीका...!

...असे अर्थपूर्ण बोल असलेल्या नव्वदच्या दशकातील (१९९१) ‘बेनाम बादशाह’ या हिंदी चित्रपटातील या गाण्याच्या उक्तीप्रमाणेच प्रचिती माता-पिता असूनही बेवारस झालेल्या एका नवजात शिशुवर आली आहे. मूळ, उत्तरप्रदेशातील लखाई तालुक्‍यातील अत्यंत गरीब कुटुंबातील रेहाना हेसिराज शेख (वय-२५) ही महिला प्रवासात असताना तिला प्रसववेदना होत असल्याने तातडीने, जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. २५ जुलैस तिने बाळाला जन्म दिला.. मात्र, जन्मत:च बाळाची प्रकृती नाजूक असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयातच नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. बाळाची प्रकृती सुधारत असताना २८ आणि २९ जुलैस या विभागातील नर्सेस व डॉक्‍टरांनी आईला दूध पाजण्यासाठी पाचारण केले. तेव्हा त्याची आई प्रसूती विभागातून डिस्चार्ज न घेताच निघून गेल्याची माहिती समोर आली. आईच नसल्याने डॉक्‍टर व नर्सेस यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत बाळाच्या दुधाची सोय करून जगवले... 

मातेविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर...
अखेर १३ ऑगस्टला या प्रकरणी बालरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील कळसकर यांनी फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसांत बाळाला सोडून गेलेल्या रेहाना शेख या महिलेविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. गेले अठ्ठावीस दिवस जिल्हा रुग्णालयातील बालरुग्ण विभागात या बाळावर उपचार सुरू असून नुकतीच त्याची ‘टु-डी इको’ तपासणी केल्यावर त्याला हृदयरोग असल्याचे निदान झाले आहे. अधिकच्या उपचाराला पाठविण्यापूर्वी कायदेशीर बाबी पूर्ण करून गुन्ह्याच्या तपासाधिकारी उपनिरीक्षक कविता भुजबळ, डॉ. स्वप्नील कळस्कर यांनी वरिष्ठांना कल्पना देत नेमकी प्रक्रिया तातडीने राबवून आज सायंकाळी सहाच्या सुमारास शासकीय रुग्णवाहिका-१०८द्वारे पोलिसासह एका डॉक्‍टरांच्या निगराणीत औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पुढच्या उपचारासाठी रवाना करण्यात आले.
 

‘बेनाम-बादशाह’चा थाट
जन्मलेल्या बाळाचे अद्यापही नामकरण झालेले नाही, तत्पूर्वीच त्याची आई निघून गेली. अद्यापही तो बेनाम असून त्याच्यासाठी कळवळा करणारी आई व धावपळ करणारे बाबा आज त्याच्या जवळ नसले तरी, शासकीय यंत्रणेनेच त्याची जबाबदारी उचलत या बाळाला जगवण्याचा विडा उचलला असून आज ‘माता कौन पिता कौन...’ची परिस्थिती असली तरी, बरा होऊन मोठा झाल्यावर कदाचित विपरीत परिस्थितीशी यशस्वी लढा देत जिंकलेला ‘बादशाह’ ठरेल, हे आज मात्र सांगता येणे कठीण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com