वाहन मागे घेत असताना धडक लागून वृद्धेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

जळगाव - मोहाडी (ता. जळगाव) येथील घरासमोरील मोकळ्या जागेत उभ्या चारचाकी वाहनाला मागे घेत असताना वृद्धेस धडक लागली. त्यात त्या खाली कोसळल्या. डोक्‍याला जबर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. इंदूबाई काशिनाथ सोनवणे (वय ६५) असे त्यांचे नाव आहे. घरच्याच गाडीने इंदूबाईंना धडक देत मृत्यू झाल्याची चर्चा गावात होती.

मोहाडी येथील इंदूबाई काशिनाथ सोनवणे या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भिला गोटू सोनवणे तसेच जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे सभापती प्रभाकर सोनवणे यांच्या वहिनी होत. आज सकाळी त्या घराबाहेर अंगणात उभ्या असताना चालकाने वाहन वळविण्यासाठी मागे घेत असताना इंदूबाई दिसून आल्या नाहीत. अचानक त्यांना जोरदार धडक लागून त्या खाली कोसळल्या. डोक्‍यास जबर दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले; परंतु डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दीर सभापती प्रभाकर सोनवणे, जिल्हा परिषदेचे सदस्य पवन भिला सोनवणे यांच्यासह मोहाडीकरांनी रुग्णालयात धाव घेतली. सोनवणे यांच्या संपर्कातील आणि नातेवाइकांनी रुग्णालयात येऊन घटनेची माहिती जाणून घेत कुटुंबीयांना दिलासा दिला. सहाय्यक फौजदार भालचंद्र पाटील, बाळकृष्ण पाटील यांनी पंचनामा केला. विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांना सोपवण्यात आले. दुपारी मोहाडी येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी डॉ. अहिरे यांनी दिलेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: jalgaon news old women death in accident