समांतर रस्त्यांच्या कामांना एप्रिलअखेर सुरवात

जळगाव - समांतर रस्त्यांचे काम तातडीने हाती घ्यावे, या मागणीसाठी कृती समितीच्या पुढाकाराने बुधवारी अजिंठा चौकात करण्यात आलेल्या महामार्ग रोको आंदोलनात सहभागी नागरिक.
जळगाव - समांतर रस्त्यांचे काम तातडीने हाती घ्यावे, या मागणीसाठी कृती समितीच्या पुढाकाराने बुधवारी अजिंठा चौकात करण्यात आलेल्या महामार्ग रोको आंदोलनात सहभागी नागरिक.

जळगाव - शहरातील महामार्गावरील अपघातांची  वाढती संख्या पाहता, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय ते बांभोरीपर्यंत बारा किलोमीटरदरम्यान समांतर रस्ते केले जातील. त्यासाठी केंद्र शासनातर्फे शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सध्या रस्त्यांचा प्रकल्प अहवालाचे काम सुरू आहे. दोन महिन्यांत निविदाप्रक्रिया पूर्ण होऊन, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात समांतर रस्त्यांच्या कामांना सुरवात होईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज येथे समांतर रस्ते कृती समितीतर्फे झालेल्या महामार्ग रोको आंदोलनप्रसंगी दिले.

अजिंठा चौकात सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत झालेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांनाही बोलाविण्यात आले होते. असंख्य नागरिक, व्यापारी, उद्योजक, नगरसेवक, महिला, युवक, विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलनात सहभाग घेतला. श्री. निंबाळकर यांच्यासह तहसीलदार अमोल निकम, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी अरविंद काळे उपस्थित होते.

कृती समितीतर्फे आज सकाळी दहाला अजिंठा चौकात महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, महामार्गावर आतापर्यंत झालेल्या अपघातांत मृत झालेल्यांना आंदोलन संपण्यापूर्वी श्रद्धांजली वाहण्यात आली.

महापौर ललित कोल्हे, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेनेचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, दिलीप तिवारी, शंभू पाटील, प्रतिभा शिंदे, फारुक शेख, विनोद देशमुख, डॉ. राजेश पाटील, प्रा. डी. डी. बच्छाव, किरण बच्छाव, ‘नवजीवन सुपरशॉप’चे अनिल कांकरिया, एकता रिटेल व्यापारी संघटनेचे ललित बरडिया, व्यापारी महामंडळाचे युसूफ मकरा, नगरसेवक रमेश जैन, इकरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष करीम सालार, नगरसेवक विष्णू भंगाळे, नगरसेवक अमर जैन, उद्योजक गनी मेमन, ॲड. सुशील अत्रे आदींसह जळगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्योजक मेमन, श्री. पाटील, नगरसेवक अनंत जोशी, श्री. तिवारी यांनी सूत्रसंचालन केले.

आंदोलनात विद्यार्थ्यांचा सहभाग
अजिंठा चौकात सकाळी नऊपासून इकरा शाळा, काशीबाई उखाजी कोल्हे शाळा, सिद्धिविनायक शाळेचे सुमारे दीड हजार विद्यार्थी आंदोलनासाठी आले होते. विविध घोषवाक्‍यांचे फलक घेऊन ‘समांतर रस्ता झालाच पाहिजे’ अशा घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आंदोलन आयोजकांतर्फे विद्यार्थ्यांसाठी बिस्कीट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

महापौर, माजी मंत्री रस्त्यावर बसले
सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी महामार्गावर महापौर कोल्हे, माजी महापौर लढ्ढा, माजी मंत्री देवकर यांच्यासह नगरसेवक, विविध सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था, महाविद्यालयातील युवकांसह विद्यार्थ्यांनी रस्त्यावर बसून आंदोलन केले.

आदिवासी नृत्य, पथनाट्य
अजिंठा चौकात समांतर रस्त्यांसाठी झालेल्या महामार्ग रोको आंदोलनात शक्ती फाउंडेशनतर्फे पथनाट्य सादर करून या रस्त्यावर होणाऱ्या अपघाताची वास्तविकता दाखविण्यात आली. उन्मेष फाउंडेशनतर्फे वैजापूर येथील आदिवासी तरुणांनी नृत्य, लोकगीत आंदोलनप्रसंगी सादर केले.

आंदोलनात नगरसेवकांची संख्या कमी
शहरातील सर्व पक्षांच्या नगरसेवकांची आंदोलनात सहभाग घेण्यापूर्वी दोन दिवसांपूर्वी महापौरांच्या दालनात बैठक झाली होती; परंतु या केवळ आठ ते दहा नगरसेवकांनी आंदोलनात हजेरी लावून सहभाग घेतल्याचे चित्र दिसत होते.

महिलांचाही लक्षणीय सहभाग
आंदोलनात असंख्य महिलांसह विविध संघटनांनी सहभाग घेतला. नवीपेठ महिला मंडळ, स्फूर्ती महिला मंडळ, वनिता विश्‍व महिला मंडळ यांसह लालबाग मित्रमंडळ, मुस्लिम मणियार बिरादरी, वीर सावरकर रिक्षा युनियन, जळगाव रनर ग्रुप, मनसे महानगर, शिवसेना शहर शाखेसह सुमारे चाळीस संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

शिक्षकाची प्रकृती बिघडली
इकरा एज्युकेशन संस्थांच्या बीएमएस महाविद्यालयातील शिक्षक शेख इब्राहिम यांना आंदोलनाच्या शेवटी छातीत दुखू लागले. त्यांना लगेच स्वयंसेवकांनी रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती बरी असल्याची माहिती देण्यात आली.

क्षणचित्रे...
‘समांतर रस्ते झालेच पाहिजेत’ या घोषणांनी परिसर दुमदुमला
महिलांसह युवतींची लक्षणीय उपस्थिती
चार रुग्णवाहिकांसह शववाहिकेला करून दिली वाट
विद्यार्थ्यांच्या हाती समांतर रस्त्यांचे लक्षवेधी फलक
आंदोलनातील शिस्तीमुळे गोंधळ झाला नाही
दोन तास अजिंठा चौक वाहनाविना

पारोळा, वरणगाव, मुक्ताईनगरलाही निधी
जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी सांगितले, की समांतर रस्ते करण्यासाठी जळगावला शंभर कोटी मिळाले; त्याचप्रमाणे पारोळा तालुक्‍याला ५० कोटी, मुक्ताईनगरला ५० कोटी, वरणगावला तीस कोटी मिळाले आहेत. तेथेही समांतर रस्ते होणार आहेत. जळगावचे समांतर रस्ते करताना सात ठिकाणी भुयारी मार्ग केले जातील. १० फुटांचा पादचारी मार्ग, वीस फुटांची पार्किंग, दुभाजक करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com