अवैध वाळू उपशावर साडेसात लाखांपर्यंत दंड

देविदास वाणी
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

जळगाव - अवैधरीत्या वाळूचा उपसा करणाऱ्यांसाठी शासनातर्फे कडक नियमावली तयार करण्यात आली असून, त्याबाबत अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. त्यावर राज्यभरातून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. नवीन नियमावलीनुसार अवैधरीत्या वाळू अथवा इतर गौण खनिज काढले, वाहून नेले, गौण खनिज काढण्यासाठी अत्याधुनिक यंत्र, क्रेनचा वापर केला तर एक ते साडेसात लाखापर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. 

जळगाव - अवैधरीत्या वाळूचा उपसा करणाऱ्यांसाठी शासनातर्फे कडक नियमावली तयार करण्यात आली असून, त्याबाबत अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. त्यावर राज्यभरातून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. नवीन नियमावलीनुसार अवैधरीत्या वाळू अथवा इतर गौण खनिज काढले, वाहून नेले, गौण खनिज काढण्यासाठी अत्याधुनिक यंत्र, क्रेनचा वापर केला तर एक ते साडेसात लाखापर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. 

गौण खनिजाच्या माध्यमातून शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. मात्र, त्यातून अवैध उपसा, वाहतूक व गुन्हेगारीही वाढीस लागते. काही केल्या ही गुन्हेगारी नियंत्रणात येत नाही. त्यामुळे आहे त्या कायदे व नियमांत बदल करून वाळू धोरणात शासनाने आणखी काही कठोर नियम नव्या वाळू धोरणात केले आहेत. त्यानुसार कोणत्याही बंदराच्या काठावरील, किनाऱ्यावरील गौण खनिज उत्खननास परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबत संबंधित जिल्हाधिकारी आदेश देवू शकतील. 

नियमांचा भंग केल्यास दंड
जमीन महसूल कायद्याचा भंग केल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याबाबत न्यायासाठी ते प्रकरण ठेवण्यात येईल. जिल्हाधिकारी गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या पाच पटीपेक्षा जास्त नसेल किंवा एक हजार रुपये यापैकी जी रक्कम अधिक असेल असा दंड ते आकारू शकतील. अनधिकृतपणे गौण खनिज काढण्यासाठी, हलविण्यासाठी, गोळा करण्यासाठी, दुसऱ्या जागी नेण्यासाठी, उचलून घेण्यासाठी किंवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली यंत्र सामग्री, साधनसामग्री आणि त्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहतुकीची साधने जप्त केली जातील. 

वाळू उपशावरील दंड

वाहन व साधने                                        दंडाची रक्कम 

ट्रॅक्‍टर, ट्रॅक्‍टर ट्रॉली, हाफ बॉडी ट्रक, सक्‍शन पंप : १ लाख रुपये
ड्रील मशिन :                                          २५ हजार
फूल बॉडी ट्रक, डंपर, ट्रॉलर, कॉम्प्रेसर :            दोन लाख रुपये
ट्रॉलर, बार्ज, मोटोराईज्ड बोट :                      ५ पाच लाख 
एक्‍सकॅवेटर, मॅकेनाईज्ड लोडर :                     ७ लाख ५० हजार
 

गौण खनिजाच्या नवीन नियमाबाबत शासनाने राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यावर हरकती मागविल्या आहेत. महिनाभरात नवीन मसुद्यावर हरकती द्यावयाच्या आहेत.
- दीपक चव्हाण, जिल्हा खनिकर्म अधिकारी

गावकऱ्यांना मिळणार वाळू
नवीन नियमानुसार एखाद्या गावातील वाळू गटाचा लिलाव झालेला नसेल, त्या ठिकाणची वाळू संबंधित गावातील गावकरी प्रचलित दरानुसार घर बांधकाम, विहीर बांधण्यासाठी प्रत्येकी दोन ब्रास वाळू काढून नेऊ शकतात. यासाठी संबंधित गावातील नागरिकांनी तहसीलदारांकडे अर्ज करणे गरजेचे आहे. वाळू वगळता इतर गौण खनिजे (माती, दगड, कंकर, खडक, मुरूम) संबंधित गावातील नागरिक स्वतःच्या घर बांधकामासाठी तहसीलदारांकडे अर्ज करून मोफत घेऊन जाऊ शकतात. मात्र हे गौण खनिज दोन ब्रासपेक्षा अधिक काढता येणार नाही.

Web Title: jalgaon news Penalty for up to seven lacs of illegal sand paddy