कामाने नव्हे; कुटुंबाच्या काळजीने खचतो पोलिस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

जळगाव - ‘कामाच्या तणावाला पोलिस कधीच घाबरत नाहीत. मात्र, या तणावाला सामोरे जाताना कुटुंबाच्या काळजीने तो अधिक खचतो,’ असे मत व्यक्तिमत्त्व विकास समुपदेशक गोपी व अनिता गिलबिले या दाम्पत्याने व्यक्त केले.

जळगाव - ‘कामाच्या तणावाला पोलिस कधीच घाबरत नाहीत. मात्र, या तणावाला सामोरे जाताना कुटुंबाच्या काळजीने तो अधिक खचतो,’ असे मत व्यक्तिमत्त्व विकास समुपदेशक गोपी व अनिता गिलबिले या दाम्पत्याने व्यक्त केले.

पोलिस दलाच्या मंगलम्‌ सभागृहात पोलिस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी गिलबिले दाम्पत्यांच्या मार्गदर्शनाचा ‘घरकुल’ उपक्रम राबविण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तणावमुक्त व आनंदी जीवन जगण्याचा मंत्रही गिलबिले दाम्पत्याने पोलिसांना दिला. तणावमुक्तीवर सकारात्मकतेने कसा बदल घडवता येतो, याचा मंत्र व्याख्याते आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व विकासक अनिता- गोपी गिलबिले यांनी उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांना दिला.

यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, उपअधीक्षक रशीद तडवी (गृह), सुनील कुराडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. श्री. कराळे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे सांगून तणावमुक्तीसाठी त्याचे महत्त्व असल्याचे सांगून उपक्रमाचे कौतुक केले.

वर्षाला एक लाख घटस्फोट
पती-पत्नीच्या संबंधासंदर्भात गेल्या काही वर्षांत झालेले बदल, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांचा महिलांच्या वागण्यावर झालेला दुष्परिणाम याबाबत विवेचन केले. विवाहापूर्वी भावी जोडीदाराची केलेली कल्पना आणि वास्तविक जीवन वेगळेच असते. जगात कुणीही परिपूर्ण नाही, असा विचार करीत सकारात्मकतेने जीवनातील अमूल्य क्षणांचा आनंद घेता येतो. वर्षाला होणारे एक लाख घटस्फोटांमध्ये सर्वाधिक कारणे  नकारात्मकतेतून जन्माला येतात, असा दावा गिलबिले यांनी केला.

भ्रष्टाचारी मार्ग नेहमीच वाईट
पोलिसांवर होणाऱ्या आरोपात भ्रष्टाचाराचे प्रमुख कारण असते. गिलबिले यांनी हाच धागा पकडत पैसा ज्या मार्गाने येतो, त्या मार्गाने जातो. म्हणून आपण कुठल्या मार्गाने पैसे कमवितो, हे अधिक महत्त्वाचे आहे. चुकीच्या मार्गाने कमविलेला पैसा घातक ठरतो. भ्रष्टाचारी मार्गाने पैसे कमवून माणूस श्रीमंत होऊ शकतो. मात्र, सुखी होत नाही.

संस्कार अन्‌‌‌ संसार
खूप पैसा कमावला आणि कुटुंबात मुलेच वाईट असली, तर असेही होता कामा नये. मुलांना चांगल्या शिक्षणासह चांगले संस्कार घडविणे, ही जबाबदारी आईचीच आहे. पालकांच्या वर्तणुकीचा प्रभाव मुलांवर होतो, म्हणून मुलांना घडविताना ‘हे करू नको, तिथं जाऊ नको,’ असे नकारात्मक विषय मांडण्याऐवजी प्रत्येक निवडीसाठी मुलांसमोर पर्याय व त्याचे फायदे- तोटे मांडले, तर त्यांच्यातील कर्तबगारी वाढविता येईल. मुलाला नेहमी दोष देणे, हे योग्य नाही.

कार्यक्रमात हास्याचे फवारे...!
दोनदिवसीय या कार्यक्रमात पोलिस प्रशासनातील वेगवेगळ्या विभागांतील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी लावलेल्या हजेरीने सभागृह खचून भरले होते. पन्नाशी गाठलेल्या गिलबिले दाम्पत्याची बोलायची शैली, वेगवेगळ्या विषयांवरील सखोल ज्ञान, पोलिस खात्यावरील बारीक निरीक्षण, त्यातून अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या सवयींचा झालेला अभ्यास आदी सर्व खुमासदार पद्धतीने त्यांनी सादर केले. तणावमुक्तीवर मार्गदर्शन करताना हास्याचे फवारे उडत खऱ्या अर्थाने हा उपक्रम तणावमुक्त होऊन आनंदाने बहरला...

रमून जा...!
ज्या माणसाची स्वप्रतिमा वाईट असते, त्याला सर्व जग वाईट दिसते. खरेतर दुसऱ्याला वाईट बोलण्याचा आपणास अधिकार नाही. त्यामुळे त्यापासून दूर राहिलेलेच बरे असते. सकारात्मक विचारांतून जीवनाला दिशा मिळते आणि त्यात जीवनाचे यश दडलेले असते. जिथे जावे तिथे रमून जावे, कामाशी एकरूप व्हावे, जे काही करायचे आहे ते स्वयंस्फूर्तीने करावे, अशा शैलीची कुठेही नक्कीच प्रशंसा होते, असा मंत्रही या गिलबिले दाम्पत्याने दिला.

Web Title: jalgaon news police