रेल्वेची भिंत पाडून केलेल्या रस्त्याची ‘व्यवहार्यता’ काय?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

जळगाव - येथील रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी रेल्वेची भिंत पाडून ‘खानदेश सेंट्रल’मधून रस्ता तयार करण्यात आला आहे. या घटनेला आठ दिवस होत नाही, तोच रेल्वे प्रशासनाने भिंत पाडलेल्या ठिकाणी ‘बॅरिकेट्‌स’ उभारले आहेत. यामुळे ‘खानदेश सेंट्रल’मधील रस्त्याने रेल्वेस्थानकावर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास वळसा घालून बाहेर पडण्याच्या संकल्पनेला तडा गेल्याची भावना जनमानसांत आता उमटू लागली आहे.

जळगाव - येथील रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी रेल्वेची भिंत पाडून ‘खानदेश सेंट्रल’मधून रस्ता तयार करण्यात आला आहे. या घटनेला आठ दिवस होत नाही, तोच रेल्वे प्रशासनाने भिंत पाडलेल्या ठिकाणी ‘बॅरिकेट्‌स’ उभारले आहेत. यामुळे ‘खानदेश सेंट्रल’मधील रस्त्याने रेल्वेस्थानकावर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास वळसा घालून बाहेर पडण्याच्या संकल्पनेला तडा गेल्याची भावना जनमानसांत आता उमटू लागली आहे.

रेल्वेने भिंत पाडलेल्या जागेवर बॅरिकेट्‌सच उभारायचे होते तर जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, महापालिकेने तीन- चार बैठका का घेतल्या? रेल्वे प्रशासनाला केवळ विनंती करून भिंत पाडून त्या जागेवर बॅरिकेट्‌स उभारायला सांगितले असते, तरी रेल्वेने ते मान्य केले असते, अशी चर्चा जनमानसांत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, खासदार ए. टी. पाटील, महापौर नितीन लढ्ढा, आमदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल यांनी रेल्वेस्थानकाजवळ व रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी ‘खानदेश सेंट्रल’मधून जाणाऱ्या रस्त्याने वाहनधारकांनी रेल्वेस्थानकाकडे जायचे. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला वळसा घालून रेल्वेस्थानक रस्त्याने बाहेर पडायचे, अशी योजना आखली होती. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तीन- चार वेळा रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना रेल्वेची भिंत पाडण्याबाबत सांगितले होते. वेळप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात भिंत पाडण्याचा पवित्रा घेतला होता. शेवटी शनिवारी (२२ जुलै) खासदार पाटील, आमदार, महापौर, रेल्वेचे महाप्रबंधक आर. के. यादव यांच्या उपस्थितीत रेल्वेची भिंत पाडण्यात आली. तासाभरात वाहतूकतही सुरू झाली.

शुक्रवारी (२८ जुलै) रेल्वेने पाडलेल्या  भिंतीजवळ बॅरिकेट्‌स लावले. यामुळे बाहेरील वाहन रेल्वेस्थानकापर्यंत जाऊच शकत नाही. ‘खानदेश सेंट्रल’मधील रस्त्याने भिंत पाडलेल्या ठिकाणी लावरलेल्या बॅरिकेट्‌सजवळ रिक्षा अथवा चारचाकी वाहने प्रवाशांना सोडून परत तेथून वळून ‘खानदेश सेंट्रल’मार्गेच परत जाऊ शकतो. थेट रेल्वेस्थानकापर्यंत वाहन जाऊ शकत नसल्याने प्रवाशांना जो व्हायचा तो त्रास कायमच राहतो आहे.

...तर वाहतुकीची कोंडी राहणार कायम!
रेल्वेस्थानक रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी ‘खानदेश सेंट्रल’मधील रस्ता महापालिकेकडे वर्ग करून रेल्वेची भिंत पाडण्यात आली. आता बॅरिकेट्‌स लावल्याने वाहतूक एकमार्गी होणे शक्‍य नाही. ‘खानदेश सेंट्रल’मधून रेल्वेस्थानकाकडे जाणारी वाहने बॅरिकेट्‌सपासून परत वळतील, तर रेल्वेस्थानक रस्त्यावरून जाणारी वाहने नेहमीप्रमाणे ये- जा करतील. नागरिकांना ‘स्टेशन रोड’च सोयीचा आहे. ‘खानदेश सेंट्रल’चा रस्ता दूरचा आहे. यामुळे वाहतूक अधिक प्रमाणात ‘खानदेश सेंट्रल’पेक्षा रेल्वेस्थानक रस्त्याचा वापर होईल. यामुळे वाहतूक कोंडी कायमच राहणार आहे.

सेंट्रल मॉल, खुल्या भूखंडांना फायदा!
भिंत पाडलेल्या जागेवरून थेट वाहन आत जात नसल्याने, त्याचा फायदा खानदेश सेंट्रल मॉल व त्यातील दुकानांना होईल. अनेक प्रवासी, व्यापारी, उद्योजक ‘खानदेश सेंट्रल’मार्गे गेले की सहज त्यांचे लक्ष मॉलमध्ये जाते. मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढेल. मॉलमध्ये फाइव्ह स्टार हॉटेलची निर्मिती, मनोरंजनाची साधने आदी बाबी प्रस्तावित आहेत. त्या सुरू झाल्या, तर प्रवासी या हॉटेलमध्ये राहण्यास प्राधान्य देतील. मॉललगत असलेल्या खुल्या भूखंडांचे दर आपोआप वाढतील. रेल्वेची भिंत पाडण्याचा हेतू दूरच राहून सेंट्रल मॉलचालक, खुला भूखंडधारकांच्या फायद्यासाठी होता काय? अशी चर्चा आता नागरिक करू लागले आहेत.

Web Title: jalgaon news railway