जिल्ह्यात पर्जन्यमान मोजण्यासाठी ८६ यंत्रेच!

सुधाकर पाटील
बुधवार, 5 जुलै 2017

भडगाव - बदलत्या नैसर्गिक परिस्थितीला ओळखणे हवामान खात्याला सद्यःस्थितीला अवघड झाले आहे. गावात पावसाच्या जोरदार सरी बरसतात, तर शिवार कोरडेठाक असते. असे असताना जळगाव जिल्ह्यातील एक हजार ५०२ गावांचे पर्जन्यमान अवघ्या ८६ गावांतील ठराविक ठिकाणी बसविलेल्या पर्जन्यमापकांवरून ठरविले जाते. हा प्रकार म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा घेण्यासारखा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्जन्यमान किती खरे आणि किती खोटे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

भडगाव - बदलत्या नैसर्गिक परिस्थितीला ओळखणे हवामान खात्याला सद्यःस्थितीला अवघड झाले आहे. गावात पावसाच्या जोरदार सरी बरसतात, तर शिवार कोरडेठाक असते. असे असताना जळगाव जिल्ह्यातील एक हजार ५०२ गावांचे पर्जन्यमान अवघ्या ८६ गावांतील ठराविक ठिकाणी बसविलेल्या पर्जन्यमापकांवरून ठरविले जाते. हा प्रकार म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा घेण्यासारखा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्जन्यमान किती खरे आणि किती खोटे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

पडलेल्या पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी महसूल यंत्रणेकडून मंडळस्तरावर ग्रामपंचायतींसह तलाठी कार्यालयांच्या छतांवर पर्जन्यमापक यंत्र बसविले जाते. पावसाळ्यात दररोज सकाळी आठला २४ तासात पडलेल्या पावसाचे मोजमाप केले जाते. त्यांची नोंद घेतली जाते. तेथील पडलेला पाऊस हा संपूर्ण मंडळातील समाविष्ट गावांचा पाऊस समजला जातो. तालुक्‍यातील मंडळात पडलेल्या पावसाची सरासरी हा तालुक्‍याचा एकूण पाऊस धरला जातो. तालुक्‍याच्या सरासरी पावसाच्या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविल्या जातात. त्यावरून राज्याचे धोरण ठरविले जाते. पाऊस मोजण्याची ही पद्धत केवळ आपल्या जिल्ह्यातच नव्हे; तर संपूर्ण राज्यात वर्षानुवर्षे तशीच सुरू आहे.

८६ पर्जन्यमापक यंत्रे
जिल्ह्यातील १५ तालुक्‍यात १ हजार ५०२ गावे आहेत. या सर्व गावात किती पाऊस पडला, हे अवघ्या ८६ गावात पडलेल्या पावसावर ठरविले जाते. भलेही पर्जन्यमापक यंत्र ज्या गावात बसविले आहे, ते वगळून मंडळातील इतर गावात पावसाचा थेंब पडला नसेल, तरी पाऊस पडल्याचे गृहीत धरले जाते. सध्याच्या बदलत्या नैसर्गिक हवामान परिस्थितीचा अंदाज हवामान खात्यालाही येत नाही. त्यामुळे एकाच गावात पडलेल्या पावसावरून इतर गावांचा पाऊस गृहीत धरणे कितपत योग्य आहे? असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. 

किती खरे? 
गावात जोरदार पाऊस पडतो तर शिवारात पावसाचा थेंब नसतो. एवढेच नाही तर चरणाऱ्या बैलाचे एक शिंग ओले तर दुसरे कोरडे राहील इतका पाऊस लहरी झाला आहे. अर्थात, याला पुष्टी देणारे अनुभव अनेकांच्या पाठी आहेत. काल (ता. ३) भडगाव शहरातील गिरणा नदीच्या पलीकडील पेठ भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. शेतात काम करणारे मजुरही घरी आले. मात्र, बस स्थानकाजवळ पावसाचा थेंब नव्हता. त्यामुळे पावसाचे शासकीय यंत्रणेकडून घेण्यात येणारे मोजमाप किती खरे व किती खोटे असते, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. 

धोरणावर होतो परिणाम
पडलेल्या पावसावर शासन धोरण ठरवते. पीक विमा हा हवामानावरच आधारित असतो. या यंत्रांवर मोजमाप झालेल्या पावसाच्या नोंदींवरच शेतकऱ्यांना लाभ दिला जातो. त्यामुळे पर्जन्यमापक यंत्र म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा घेणारे ठरले आहेत. त्यामुळे शासनाने पाऊस मोजण्याच्या पद्धतीत बदल करावा व सर्वसमावेशक अशी नवी पद्धत विकसित करावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

पर्जन्यमान मोजण्याची पद्धत बदलवणे ही काळाची गरज बनली आहे. जुनी पद्धत कालबाह्य ठरली आहे.  प्रत्येक गावात हवामानाचा अंदाज सांगणारे केंद्रच शासनाने उभे करायला हवे. शेतकऱ्यांच्या सध्याच्या अडचणीला नैसर्गिक परिस्थितीही काही प्रमाणात कारणीभूत आहे. गावातच पावसाचे मोजमाप झाले अन्‌ हवामानाचा अंदाज आला तर शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा अडचणी दूर होण्यास मदत होईल
- विश्वासराव पाटील, कृषिभूषण, लोहारा (ता. पाचोरा)

Web Title: jalgaon news rain