परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर फिरवले पाणी 

सुधाकर पाटील
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

कसली दिवाळी? दिवाळ निघण्याची वेळ आलीय...
दिवाळीचा सण दोन दिवसावर आलेला आहे. मात्र शेतकर्याच्या घरात त्यादृष्टीने अद्याप लगबग दिसत नसल्याचे चित्र आहे. पर्यायाने बाजारपेठ पुरती मंदावली आहे. हातात पेसै नाही. परतीच्या पावसाने पीकांचे मोठे नुकसान केला. चढ्या मजुरीने शेतकरी उसासारखा पिळला जात आहे. घरात कापुस आहे. पण ओला सांगुन व्यापारी कमी दराने मागत आहे. त्यामुळे  "कसली आली दिवाळी? येथे दिवाळ निघण्याची वेळ आली आहे" अश्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गातुन व्यक्त होत आहे.

भडगाव : शेतातील बहरलेले पीक पाहून उत्पादनाचे इमले रचनाऱ्या शेतकऱ्याच्या स्वप्नावर परतीच्या पावसामुळे पाणी फिरण्याचे चिन्हे आहेत. त्यामुळे गिरणा पट्ट्यातील बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. दिवाळ सण दोन दिवसावर आलेला असतांना ही शेतकऱ्याची त्यादृष्टीने लगबग दिसत नाही. 

मॉन्सूनपुर्व पावसाने यंदा पुर्व हंगामी कापसाच्या बरोबरीने खरीप कापसाचे पीक बहरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कापुस पिकातुन मोठ्या उत्पादनाची आस लागुन होती. दिवसभर कापसाचे पीक पाहून उत्पादनाचे स्वप्न उश्याला घेऊन झोपणाऱ्या गिरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या रंखविलेल्या स्वप्नांचा पार चुराडा झाला आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण झाली आहे. भातासारखे झालेले कापसाच्या शेताच्या बोंडातील कापुस  पावसाने जमिनीवर गळुन पडला. तर ज्वारीचे चमकणारे कणीस काळे पडले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. एका हाताने देव देतो आणि लगेचच दुसऱ्या हाताने काढुन घेता अशा प्रतिक्रिया शेतकर्याकडुन कानी पडत आहे.

त्यात आकाशात ढग गर्दी करत असल्याने शेतातील आलेले उत्पादन घरात आणण्यासाठी शेतकऱ्याची लगबग आहे. पण या लगबगीचे मजुरांनी संधीचे सोने केले आहे. त्यांनी आपले मजुरीच्या दरात मोठी वाढ केली आहे. अर्थात मागणी व पुरवठ्यात तफावत झाल्यास दर वाढतात हा नियण अर्थशास्त्रच सांगतो. पण हे शेतकऱ्यासाठी दुष्काळात तेरावा महिना ठरला आहे. अगोदरच संकटाच्या गर्तेत असलेला बळीराजा आणखी हैराण झाला आहे. उत्पादन खर्च व येणाऱ्या उत्पादनाची जमाबाकी केल्यावर शेतकऱ्याच्या पदरी तोटा पडण्याची परीस्थिती सद्य:स्थितीला दिसते आहे.

खरीपात तोटा आला तो रब्बीत भरून निघेल या आशेवर शेतकरी असतो. मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण पन्नास ट्क्क्याच्या खाली असल्याने जमिनीत पाणी नाही. पर्यायाने विहीरच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे रब्बी हंगामाच्या आशाही धुसर आहेत. त्यात गिरणा धरण 70 टक्के भरल्याचे समाधान आहे. मात्र त्यातुन अंजनी व बोरी प्रकल्पात पिण्यासाठी पाणी सोडण्यात आल्यास शेतीसाठी सोडण्यात येणार्या आवर्तनावर काही प्रमाणात परीणाम जाणवणार आहे. दरम्यान परतीच्या पावसाने शेतकर्याच्या डोळ्यात 'आसव' दिले असले तर काहीसाठी तो दिलासा म्हणजेच ' हसु' देणारा ठरला आहे. पण फायद्यापेक्षा तोटाच अधिक वाट्याला आला आहे. नुकसानीचे पंचनाम्याची बोळवण होत आहे पण त्यातुन शेतकर्याच्या पदरात भरपाई मिळेल का? हा खरा प्रश्न आहे. कारण भरपाई मिळण्यासाठी ही ठराविक मी.मी.पाऊस पडला पाहीजे असे निकष आहेत. त्यामुळे तितका मी.मी.पाऊस पडला असेल तरच शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरतात. 

कसली दिवाळी? दिवाळ निघण्याची वेळ आलीय...
दिवाळीचा सण दोन दिवसावर आलेला आहे. मात्र शेतकर्याच्या घरात त्यादृष्टीने अद्याप लगबग दिसत नसल्याचे चित्र आहे. पर्यायाने बाजारपेठ पुरती मंदावली आहे. हातात पेसै नाही. परतीच्या पावसाने पीकांचे मोठे नुकसान केला. चढ्या मजुरीने शेतकरी उसासारखा पिळला जात आहे. घरात कापुस आहे. पण ओला सांगुन व्यापारी कमी दराने मागत आहे. त्यामुळे  "कसली आली दिवाळी? येथे दिवाळ निघण्याची वेळ आली आहे" अश्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गातुन व्यक्त होत आहे. गतवर्ष सोडले तर मागील दोन वर्षे दुष्काळाने गिरणा पट्ट्यात मुक्काम ठोकला होता. त्यामुळे शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आला आहे.

Web Title: Jalgaon news rain in jalgaon