‘सिव्हिल’च्या स्वच्छतेबाबत ठेकेदाराला नोटीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

जळगाव - जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचेच आरोग्य धोक्‍यात आले आहे. रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातलगांना देखील नाका-तोंडाला रुमाल बांधून जावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत ‘सकाळ’ने आज प्रकाशझोत टाकत वस्तुस्थिती समोर आणली. याची दखल घेत रुग्णालय प्रशासनाने ठेकेदारास नोटीस बजावत नियमित स्वच्छता करण्याचे आदेश काढले आहेत.

जळगाव - जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचेच आरोग्य धोक्‍यात आले आहे. रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातलगांना देखील नाका-तोंडाला रुमाल बांधून जावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत ‘सकाळ’ने आज प्रकाशझोत टाकत वस्तुस्थिती समोर आणली. याची दखल घेत रुग्णालय प्रशासनाने ठेकेदारास नोटीस बजावत नियमित स्वच्छता करण्याचे आदेश काढले आहेत.

जिल्हा रुग्णालयात दिवसभरात शेकडा रुग्ण तपासणीसाठी येत असतात. काहींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागते. पण येथे येणाऱ्या रुग्णांना अस्वच्छता आणि उग्र वासाचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे रुग्णांचे आरोग्य सुधारते की बिघडते; हाच मुळात प्रश्‍न निर्माण झाला आहे. वॉर्डांमध्ये आणि बाहेरील वऱ्हाड्यांत केवळ पाण्याने फरशी पुसण्याचे काम केले जाते. यासाठी ‘फिनाईल’चा वापर होत नसल्याचे येथे पाहावयास मिळते. परिणामी रुग्णालयातील दुर्गंधी कमी न होता वाढतच आहे.

ठेकेदाराला तंबी
जिल्हा रुग्णालयातील सर्व वॉर्ड आणि दोन्ही इमारतींच्या परिसरातील स्वच्छता, फरशी पुसण्यासाठी ‘साई मल्टी सर्व्हिसेस’ला ठेका देण्यात आला आहे. नियमानुसार रोज स्वच्छता, वॉर्डातील कचरा उचलणे, फिनाईलचा वापर करून फरशी पुसणे यासारखी कामे करणे आवश्‍यक आहेत. परंतु, असे होताना दिसून येत नसल्याने घाण, दुर्गंधीचे जणू माहेरघरच झाले आहे. याबाबत ‘सकाळ’मधून आज ‘सिव्हीलमधील सुविधा आयसीयूत’ या शिर्षकांतर्गत जिल्हा रुग्णालयातील स्थिती मांडली आहे. याची दखल घेत प्रशासनाने ‘साई मल्टी सर्व्हिसेस’ला नोटीस बजावली आहे. यापुढे स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यास ठेका रद्द करून काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटिसीत म्हटले आहे.

मुकादम अन्‌ परिचारिकांनाही पत्र
रुग्णालयाचा परिसर स्वच्छ करण्याचे काम मुकादमाच्या निगराणीत केले जाते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील दोन्ही मुकादमांना देखील नोटीस देऊन अस्वच्छतेबाबत जबाबदार धरण्यात आले  आहे. ठेकेदाराकडून हे काम न केल्यास पुढील इन्क्रिमेंट रोखण्यात येणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या 
आहेत. रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डातील परिचारिकांना देखील  पत्र देऊन आठवड्यात ठरवून दिल्याप्रमाणे काम करण्याची जबाबदारी पार पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेसाठी ठेका देण्यात आला आहे.

स्वच्छता करण्याबाबत संबंधित ठेकेदाराला नोटीस बजाविण्यात आली आहे. यापुढे देखील स्वच्छतेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली जाईल.
- डॉ. नागुराव चव्हाण,  जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: jalgaon news sakal news