चिमण्या वाचविण्यासाठी सरसावले पक्षीप्रेमी

chalisgaon
chalisgaon

चाळीसगाव : आजच्या युगात चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही दिसेनाशा झाल्या आहेत. अशा परिस्थितीत संवेदनशील मन स्वस्थ बसू शकत नाही. सृष्टीतील प्रत्येक जिवाचे अस्तित्व हे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यावश्‍यक आहे. चिमण्यांच्या घटत्या संख्येचा विचार येथील येथील युगंधरा फाऊंडेशनतर्फे आज जागतिक चिमणी दिनानिमित्त विविध शाळांसह शासकीय कार्यालयांमध्ये घरटी वाटप करण्यात आले. 

युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. शहरातील डॉ. काकासाहेब पूर्णपात्रे विद्यालय व आनंदीबाई बंकट मुलींच्या शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांनी चिमणी वाचवा संदर्भात माहिती दिली. चिमणी पक्षी दुर्मिळ का होत चालला आहे, त्याचे संगोपन कसे करता येईल, त्यांना निवारा आणि खाद्याची मुबलकता कशी करून देता येईल याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने पक्ष्यांच्या निवाऱ्यासाठी घरटे वा तत्सम घराची प्रतिकृती परिसरातील झाडावर तसेच परसबागेत लावायला हवी, घरटी बसविताना सुद्धा काळजीपूर्वक बसवली जावीत, विशेषतः: तिथे ऊन किंवा पाऊस येणार नाही, घरटे कावळे किंवा घारीच्या नजरेस पडणार नाही हे पाहूनच घरटे बसवले जावे याची काळजी घ्यायला हवी असे सांगण्यात आले. 

येथील अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनीही आपल्या राहत्या घरी जागतिक चिमणी दिनाच्या औचित्याने घरटे बसवून अभिनव संदेश दिला. याशिवाय शहरातील अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, ग्रामीण पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय, वाहतूक पोलिस कार्यालय तसेच शहरातील विविध माध्यमिक विद्यालयातील परिसरात घरटी बसविण्यात आली. 

पर्यावरण राखण्यासाठी व पक्षांची जीवसृष्टी वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित आले पाहिजे, असे मत मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. हेमांगी पूर्णपात्रे, युगंधरा फाउंडेशनच्या अध्यक्षा लता जाधव, राखी संगेले, छाया पाटील, काकासाहेब पूर्णपात्रे विद्यालयाचे पर्यवेक्षक विवेक देसले, श्रीमती एस. बी. सिया, वाल्मिक महाजन, मनीषा पाटील, ललिता सामुद्रे, अमोल महाजन, विक्रांत चांदणे, आ. बं. हायस्कूलचे उपमुख्याध्यापक साहेबराव मोरे, आर. एस. मोरे, प्रवीण राजपूत, सीमा माळदकर, मिलिंद शेलार, दिलीप जैन आदी उपस्थित होते. यशस्वितेसाठी स्वप्निल कोतकर, छाया पाटील, कावेरी पाटील, दिलीप पाटील आदींचे सहकार्य लाभले. 

चिमण्यांसाठी चळवळ उभारावी : सौ. बच्छाव 
याप्रसंगी बोलताना स्मिता बच्छाव यांनी सांगितले, की एक काळ असा होता की जेव्हा चिमण्यांचा चिवचिवाट सतत कानी पडायचा. अंगणात दाणे टिपायला आलेल्या चिमण्यांची बाळाला जेवण भरविण्यासाठी मदत व्हायची. "एक घास काऊचा व एक घास चिऊचा" असे म्हणत चिमण्या दाखवीत आई बाळाला घास भरवायची. आता मात्र चिमण्या दूरवर निघून गेल्या. त्यांनी घरटी करावीत, अंगणात गिरक्‍या घ्याव्यात असे वातावरण आज राहिलेले नाही. त्यामुळे सिमेंटच्या जंगलात चिमण्या दूरवर उडाल्या. त्यांची संख्या का घटली हा संशोधनाचा प्रश्न आहे. याबाबत चळवळ उभारायला हवी असेही सौ. बच्छाव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com