ज्वारी, बाजरीसह कापूसही हातचा गेला! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

ज्वारी, बाजरीसह कापूसही हातचा गेला! 

जळगाव ः महाराष्ट्रासह जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. ज्वारी, बाजरी, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कपाशीची बोंडे या पावसाने खराब झाली आहेत. 

ज्वारी, बाजरीसह कापूसही हातचा गेला! 

जळगाव ः महाराष्ट्रासह जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. ज्वारी, बाजरी, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कपाशीची बोंडे या पावसाने खराब झाली आहेत. 

बदलत्या वातावरणाचा पावसावरही परिणाम होत आहे. जून ते सप्टेंबर असे चार महिने पावसाचे असताना आता ऑक्‍टोबरमध्ये गेल्या चार- पाच दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. पावसामुळे रब्बी हंगामाला पोषक वातावरण तयार होत असले, तरी खरीप हंगामातील हातात आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने ज्वारी, बाजरी काळी पडली आहे. अनेक शेतांमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा नसल्याने पिके सडत आहेत. अनेकांनी पिकांची कापणी केली आहे. मात्र, दमट वातावरणाने दाण्यांवर बुरशीजन्य परिस्थिती आहे. 

कपाशीची बोंडे सडली 
अनेक शेतांमध्ये कपाशीला बोंडे लागली आहेत. अतिपावसामुळे बोंडे खराब होत आहेत. कपाशीची बोंडे उमलून जमिनीवर पडत आहेत. नोव्हेंबरमध्ये बऱ्यापैकी कापूस बाजारात येत असतो; परंतु यंदा पाऊस लांबल्याने कापसाची आवक मंदावली आहे. 

पंचनाम्याची प्रतीक्षा 
जिल्ह्यात चार दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, प्रशासकीय पातळीकडून अद्याप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नाहीत. सर्व कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामांत व्यस्त आहेत. सोमवारी (ता. 21) मतदान झाले. आता गुरुवारी (ता. 24) मतमोजणी होणार आहे. त्यानंतर दिवाळीच्या सुट्या यामुळे तब्बल आठवड्यानंतर पंचनामे करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध होतील. 

जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पंचनामे अद्याप झालेले नाहीत. कर्मचारी निवडणुकीच्या कामांत व्यस्त आहेत. कर्मचारी उपलब्ध झाल्यानंतर पंचनामे होतील. 
- संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon news shetiche nuksan