शिवसेना लोकसभेच्या दोन्ही जागा स्वतंत्र लढणार - संजय सावंत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

जळगाव - शिवसेना लोकसभेची जिल्ह्यातील जळगाव व रावेर मतदारसंघांतील निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असून, त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीत खानदेश विकास आघाडीसोबत युती करण्यासंदर्भात उद्धव ठाकरेच निर्णय घेतील, असे मत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

जळगाव - शिवसेना लोकसभेची जिल्ह्यातील जळगाव व रावेर मतदारसंघांतील निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असून, त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीत खानदेश विकास आघाडीसोबत युती करण्यासंदर्भात उद्धव ठाकरेच निर्णय घेतील, असे मत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

जळगाव जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर श्री. सावंत प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. आज दिवसभर त्यांनी जळगाव लोकसभा क्षेत्रातील तालुकानिहाय कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर पद्‌मालय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित केली. माजी आमदार चिमणराव पाटील, जळगाव लोकसभा क्षेत्रातील जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, महानगराध्यक्ष शरद तायडे, गणेश सोनवणे, किशोर भोसले आदी यावेळी उपस्थित होते. 

श्री. सावंत म्हणाले, की शिवसेना लोकसभेच्या जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांतील निवडणूक स्वतंत्रपणे लढणार आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे. त्याचदृष्टीने कार्यकर्त्यांची बैठकही घेतली. त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना सूचनाही दिल्या. 

‘खाविआ’बाबत चर्चा
जळगाव महापालिकेच्या निडणुकीत खानदेश विकास आघाडीसोबत युती करण्याबाबत शिवसेना नेते उद्धव ठाकरे, सुरेशदादा जैन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हेच एकत्रितपणे चर्चा करून निर्णय घेतील. त्यानुसार या निवडणुका लढविण्यात येतील.

सरकारच्या मनमानीला लगाम
शिवसेना सत्तेत असल्याबाबत ते म्हणाले, की शिवसेना केंद्रात व राज्यात सत्तेत असली, तरी आम्ही जनहिताविरुद्ध झालेल्या निर्णयास विरोध करीत आहोत. सरकार कोणतीही मनमानी करीत असेल, तर त्याला लगाम घालण्याचे काम आम्ही सत्तेत राहून करीत आहोत.

सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे मदत
सावंत हे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे सदस्य आहेत. याबाबत ते म्हणाले, की या ट्रस्टच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील गरजू व्यक्तींना औषधोपचार तसेच इतर मदत करण्यात येईल.

Web Title: jalgaon news Shiv Sena will contest both the seats of the Lok Sabha