गाळेभाडे थकबाकीची बिले अद्याप अपूर्णच!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

जळगाव - महापालिकेच्या मालकीच्या मुदत संपलेल्या १८ व्यापारी संकुलांतील गाळ्यांची मागील पाच वर्षांची थकबाकी गाळेधारकांनी भरलेली नाही. त्यामुळे बिले बजावून थकबाकी वसूल केली जाणार आहे. मात्र, गाळेधारकांच्या थकबाकीची बिले तयार करण्याचे काम महापालिकेने अद्याप पूर्ण केले नसल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी, बिलवाटप केव्हा होईल आणि त्यानंतर गाळेजप्ती, लिलावाची प्रक्रिया केव्हा पार पडेल, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दरम्यान, उद्या (२ जानेवारी) मुंबईत मुख्यमंत्र्यांकडे गाळेप्रश्‍नावर बैठक होणार असल्याने सर्व गाळेधारकांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

महापालिका मालकीच्या १८ व्यापारी संकुलांतील २ हजार ३३८ गाळ्यांची मुदत २०१२ ला संपलेली आहे. या व्यापारी संकुलांतील गाळे ताब्यात घेण्याबाबत औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिला आहे. त्यानुसार प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. गाळेधारकांकडे २०१२ पासून ते आजतागायत थकबाकी आहे. जोपर्यंत थकबाकी भरणार नाही, तोपर्यंत संबंधित गाळेधारकांना लिलाव प्रकियेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे बिले बजावून थकबाकी वसूल केली जाणार आहे. परंतु, बिल देण्याचे काम अजून अपूर्ण असल्याची माहिती मिळाली आहे.

बिलवाटप होणार कधी ?
मागील महिन्यात प्रभारी आयुक्तांनी महासभेत गाळेजप्तीची कारवाई लवकरच केली जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली. गाळेधारकांची थकबाकी काढण्याचे कामही सुरू झाले. परंतु, मागील व आतापर्यंतच्या थकबाकीचे बिल अजून अद्याप तयार झालेले नाही. बिलवाटप झाल्यानंतर गाळेधारकांना थकबाकी भरण्यासाठी पंधरा दिवस मुदत दिल्यानंतर गाळे लिलाव प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांकडे आज बैठक
महापालिकेच्या मालकीच्या मुदत संपलेल्या १८ व्यापारी संकुलातील गाळे कराराने देण्यात येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर उद्या (ता. २) मुंबईत मुख्यमंत्र्यांकडे बैठक होणार आहे. या बैठकीला महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी आणि काही गाळेधारकांची प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

प्रीमियम घ्यावा की नाही?
गाळेधारकांनी थकबाकी न भरल्यास संबंधित गाळेधारकांची मालमत्ता जप्त केली जाणार आहे. त्या अनुषंगाने मालमत्तांचा शोध घेण्यात येत आहे. थकबाकी न भरल्यास गाळे लिलाव प्रक्रियेत गाळेधारकास सहभाग घेता येणार नाही. लिलाव केल्यानंतर हे गाळे ३० वर्षांच्या कराराने देण्याबाबत प्रशासनाकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यातूनच १०० टक्के प्रीमियम घ्यावा की,  ५० टक्के प्रीमियम आकारून नाममात्र भाडे आकारणी करायची, याबाबत महापालिकेकडून अभ्यास केला जात आहे.

गाळ्यांचे मूल्य कोटीत येणार
शासनाच्या रेडिरेकनर तसेच बाजार किमतीनुसार फुले मार्केटमधील अनेक गाळ्यांच्या किमती या कोटीच्या घरात जाण्याची शक्‍यता आहे. तसेच दुसऱ्या अन्य मार्केटमधील गाळ्यांचे मूल्य हे १५ लाखांपासून ५० लाखांपर्यंत आहे. त्याआधी गाळेधारकांना २०१२ ते २०१७  या पाच वर्षांतील गाळाभाड्याची मोठी थकबाकी भरावी लागणार आहे.

Web Title: jalgaon news shop rent arrears bill pending